लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्ह्यात गत काही दिवसांत कोसळलेल्या पावसामुळे बहुतांश गावांमधील खरिपातील पिके अंकुरली आहेत; मात्र पर्जन्यमान अगदीच अल्प प्रमाणात तद्वतच सार्वत्रिक स्वरूपात नसल्याने जिल्ह्यातील धरणांसह अन्य जलस्त्रोतांची पातळी न वाढल्याने उद्भवलेली भीषण पाणीटंचाईची स्थिती अद्याप कायमच आहे. पर्यायाने पाणीटंचाई निवारण उपाययोजनांवरील खर्चात देखील यंदा वाढ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्ह्यात दरवर्षी साधारणत: जून महिण्याच्या पंधरवड्यात दमदार स्वरूपात पाऊस होतो. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीची कामे देखील वेळेत आटोपली जातात. यंदा मात्र पावसाला विलंबाने सुरूवात होण्यासोबतच जिल्ह्यातील काहीच गावांमध्ये तोही तुरळक स्वरूपात पाऊस झाला. त्याआधारे सुमारे ७० टक्के शेतकऱ्यांनी पेरणी केली असून पिके देखील अंकुरली आहेत. असे असले तरी पिकांची वाढ होण्यासाठी पावसात सातत्य असणे आवश्यक असून त्याचा प्रामुख्याने अभाव आहे. दुसरीकडे पावसाळ्याचे दिवस असूनही अद्यापपर्यंत संततधार तथा मोठ्या स्वरूपातील पाऊस झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ३ मध्यम आणि १३१ लघूप्रकल्पांसह विहिरी, हातपंप आणि कुपनलिकांच्या पाणीपातळीतही विशेष वाढ झाली नसल्याने उद्भवलेली भीषण पाणीटंचाईची स्थिती अद्याप कायम आहे. सद्य:स्थितीत ६४ गावांमध्ये ६४ टँकरने पाणीपुरवठा, ३०० पेक्षा अधिक विहिरींचे अधिग्रहण यासह अन्य स्वरूपातील टंचाई निवारण उपाययोजना राबविण्यात येत असून एरव्ही ३० जूननंतर बंद केल्या जाणाºया या उपाययोजनांना शासनस्तरावरून मुदतवाढ दर्शविण्यात आली आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी पाणीटंचाई निवारण उपाययोजनांवर प्रत्यक्ष तरतूदीपेक्षा अधिक खर्च होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.(प्रतिनिधी)
खरिपातील पिके अंकुरली; पाणीटंचाई कायमच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 2:10 PM