लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : खरीप हंगाम २०१७ साठी लागू असलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेमुळे जिल्ह्यातील नऊ पिकांना विमा संरक्षण मिळणार आहे. दरम्यान, कर्जदार शेतकऱ्यांना पिक विमा बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली.सोयाबीन, कापूस, तूर, मुग, उडीद व खरीप ज्वारी पिकाचा विमा योजनेत समावेश आहे. तसेच भात पिकासाठी वाशिम, रिसोड व मालेगाव तालुक्याचा समावेश असून भुईमुग पिकासाठी मालेगाव, कारंजा व तीळ पिकासाठी वाशिम, मानोरा, कारंजा तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिके घेणारे कुळाने अगर भाडेपट्ट्याने जमीन करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी पात्र आहेत. शेतकऱ्यांवरील विम्याच्या हप्त्याच्या भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी २ टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के मर्यादित ठेवण्यात आला आहे. योजनेतील विमा उतरविलेल्या पिकांसाठी जोखिमस्तर ७० टक्के असा निश्चित करण्यात आला आहे. तसेच अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांचे उंबरठा उत्पन्न हे मागील ७ वर्षांचे सरासरी उत्पन्न (नैसर्गिक आपत्ती जाहीर झालेली २ वर्ष वगळून) गुणीले त्या पिकाचा जोखिमस्तर विचारात घेवून निश्चित केले जाणार आहे. शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव बँकेकडे सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०१७ पर्यंत आहे. प्रस्तावासोबत सातबारा, ८ अ उतारा, पिक पाहणी झाली असल्यास पेरणीबाबतचा तलाठ्याचा दाखला जोडणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांचे संबंधित बँकेत खाते असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन गावसाने यांनी केले.
कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा बंधनकारक !
By admin | Published: June 30, 2017 7:44 PM