लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील ७९५ गावांमधील पिकांचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, नुकसानाचे पंचनामे करण्यात आले असून, आता विभागीय आयुक्त आणि पिकविमा कंपन्यांकडे वस्तूनिष्ठ अहवाल सादर करण्यासाठी प्रशासनाकडून विहित प्रपत्रात पंचनाम्यातील माहिती समाविष्ट करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी दुसरा शनिवार या सुटीच्या दिवशीही तालुका कृषी अधिकारी, तलाठी, मंडळ कृषी अधिकाऱ्यांसह अन्य सर्व कर्मचारी तालुका कृषी अधिकारी आणि तहसील कार्यालयातील संगणकांवर ‘डाटा एन्ट्री’करिता हजर असल्याचे दिसून आले.आॅक्टोबर महिन्याच्या २७ तारखेपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने अक्षरश: थैमान घातले. ३ नोव्हेंबरपर्यंत जोर कायम असलेल्या या पावसामुळे सोंगून शेतात रचून ठेवलेल्या सोयाबिनच्या सुड्या पूर्णत: ओल्या होण्यासह सोंगणीच्या स्थितीत असलेले उभे सोयाबिन, कपाशी, तूर, हळद, फुलांची झाडे, फळबागांना जबर फटका बसला. दरम्यान, शासनाच्या आदेशाचे पालन करित महसूल, कृषी विभागाने तातडीची पावले उचलत नुकसानाचे सर्वेक्षण व पंचनामे करण्याची कामे हाती घेतली. त्यासाठी ८ नोव्हेंबरची अंतीम मुदत देण्यात आली होती. त्यानुसार, जिल्ह्यातील ७९५ गावांमध्ये झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून प्रशासकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडील लिखीत अहवाल कृषी विभाग आणि तहसील कार्यालयांकडे सादर केले आहेत. आता या लिखीत अहवाल गावनिहाय, तहसीलनिहाय वेगवेगळे करून संगणकातील ठराविक प्रपत्रात भरण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी ९ नोव्हेंबरला दुसरा शनिवार हा सुटीचा दिवस असतानाही प्रशासकीय यंत्रणेतील सर्व कर्मचारी तालुका मुख्यालयी तहसील कार्यालय आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयात हजर असल्याचे दिसून आले. हे काम आटोपल्यानंतर अंतीम अहवाल विभागीय आयुक्त आणि विविध पिकविमा कंपन्यांकडे सादर केले जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.‘पीक विमा क्लेम’ अर्जांची पडताळणीजिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात २ लाख ९५ हजार २९० शेतकºयांनी २ लाख ४ हजार १०० हेक्टर क्षेत्रासाठी १७ कोटी ६२ लाख ९३ हजार २१४ रुपये पिकविम्यापोटी भरले आहेत. दरम्यान, २७ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत अवकाळी पावसामुळे झालेल्या अनेक शेतकºयांनी पिकविमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळण्याकरिता अर्ज केले आहेत. सदर अर्ज जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी कार्यालयांना प्राप्त झाले असून ते गावनिहाय वेगवेगळे करून पडताळणी केली जात आहे. त्यानंतर सदर सर्व अर्जांची ‘डाटा एन्ट्री’ करून प्रत्यक्ष नुकसानाचे अहवाल विमा कंपन्यांकडे सादर केले जातील, अशी माहिती वाशिमचे तालुका कृषी अधिकारी अभिजित देवगिरीकर यांनी दिली. शनिवारी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचाºयांकडून हे काम गतीने सुरू असल्याचे दिसून आले.
नुकसान पंचनाम्यांच्या ‘डाटा एन्ट्री’चे काम युद्धस्तरावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 1:24 PM