धनज बु. : गत १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पिकांची स्थिती वाईट झाली असून, धनज बु. पासूननजीकच असलेल्या मेहा येथील शेतकऱ्याने पावसाभावी सुकलेल्या सोयाबीन, तूर पिकावर नांगर फिरवला. पावसाने दडी मारल्याने धनज बु. परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत.
जिल्ह्यात गत १५ ते १७ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके सुकत चालली आहेत. काही शेतकरी सिंचनाचा आधार घेऊन पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत; परंतु कोरडवाहू शेती आणि पावसाच्याच भरवशावर असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतामधील पिके मात्र हातची जात असल्याचे दिसत असून, अनेक शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यात मेहा येथील जयराम कान्होजी गुजर या शेतकऱ्याने आपल्या शेत सर्व्हे क्रमांक १२२ मधील शेतात सोयाबीन व तुरीची पेरणी केली होती. सुरुवातीला पेरणीयोग्य पाऊस झाल्याने या शेतकऱ्याने शेतात सोयाबीन व तुरीची पेरणी केली होती. पेरणी केल्यानंतर पीक चांगले बहरलेसुद्धा होते. परंतु पावसाने तब्बल १५ दिवस दडी मारल्याने सोयाबीन व तूर पीक उन्हामुळे पूर्णत: करपल्याने अखेर हतबल होऊन या शेतकऱ्याने या सुकलेल्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला. आधीच बियाण्याच्या भावात झालेली भाववाढ त्यात आता दुबार पेरणीचे संकट आल्याने शेतकरी पूर्णत: हवालदिल झाला आहे.
^^^^^^^
पाच एकरात दुबार पेरणीचे संकट
मेहा येथील शेतकरी जयराम गुजर यांनी जूनच्या सुरुवातीला आलेल्या पावसाच्या भरवशावर पाच एकर क्षेत्रात सोयाबीन आणि तूर पिकाची पेरणी केली; परंतु जूनच्या अखेरच्या आठवड्यातील सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली. त्यामुळे गुजर यांच्या शेतामधील पीक पूर्णपणे सुकले आणि हे पीक आता पावसानेही सुधारण्याची शक्यता नसल्याने त्यांनी पिकावर नांगरच फिरविला. त्यामुळे पाच एकरात दुबार पेरणीचे संकट त्यांच्यावर ओढवले असून, आता पेरणीसाठी पैसा आणावा कोठून, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा झाला आहे.
-----
कोट: जूनच्या सुरुवातीला दमदार पाऊस पडल्याने मी ५ एकर शेतात सोयाबीन व तूर पिकाची पेरणी केली होती. पेरणीनंतर पाऊस चांगला झाल्याने पिकाची स्थिती उत्तम होती; परंतु पावसाने दडी मारल्याने पीक सुकल्याने या पिकावर नांगर फिरवावा लागला. आता दुबार पेरणी कशी करावी, हा मोठा प्रश्न समोर पडला आहे.
- जयराम गुजर,
शेतकरी, मेहा