नुकतीच जमिनीवर आलेल्या पिकाची होत असलेली नासाडी कोरडवाहू शेतकरी उघड्या डोळ्याने पाहत आहेत. शेतातील कामधंदे बंद पडल्यामुळे ग्रामीण भागातील मजूर ठाण मांडून घरी बसला आहे. दररोज उजाडणारा दिवस पाण्याविना कोरडा जात असल्याने सर्वत्र चिंतेचे सावट पसरले आहे. यंदा वेळेवरच मान्सूनचे आगमन होईल व तो सरासरीपेक्षा जास्त पडणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. या अंदाजानुसार ७ ते १० जूनदरम्यान मान्सूनच्या पावसाने सुरुवात करून दिली होती. त्यामुळे पावसाळा सुरू झाला असे समजून ९० टक्के शेतकऱ्यांनी पेरणी केली; परंतु ही पिके जमिनीवर येत नाहीत, तोच पावसाने तीन आठवड्यांपासून दडी मारली आहे. त्यामुळे झालेली पेरणी धोक्यात सापडली आहे, तर पावसाअभावी अद्यापही काही पेरण्या रखडल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर पेरणी केली अशा हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यातच दररोज कडक ऊन पडत असल्यामुळे जमिनीतील ओलावा नष्ट होत चालला आहे; परंतु ७ जुलैच्या रात्री तालुक्यात चांगला पाऊस पडल्याने पिकांना संजीवनी मिळाली आहे. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
-------
शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातुर झाले हाेते. पावसासाठी अनेक ठिकाणी देवाकडे साकडे, धाेंडी काढण्यात आली. पेरणीनंतर पाऊसच न झाल्याने पिके करपण्यास सुरुवात झाल्याने दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली हाेती; परंतु ७ जुलै राेजी पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान टळल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.