लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनाकडून बांधकाम कामगारांना विविध सोयी-सुविधा देण्यात येतात. त्यासाठी मात्र संबंधित कामगाराची रितसर नोंदणी असणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने गत काही दिवसांपासून ही प्रक्रिया राबविण्यात येत असून नोंदणी करण्याकरिता कामगारांची कार्यालयावर अक्षरश: झुंबड उडत आहे. यादरम्यान वादावादीच्या घटनाही घडत आहेत. असेच एक प्रकरण वाशिम शहर पोलिसांत १७ फेब्रूवारीला दाखल झाले.महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदीत कामगारांना गृह उपयोगी वस्तू खरेदीसाठी अर्थसहाय्य, लाभार्थी कामगारांच्या पाल्ल्यास व्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचे वाटप, विविध कल्याणकारी योजनेचे आर्थिक सहाय्य, अवजारे खरेदी करण्यासाठी ५ हजार रुपये अर्थसहाय्य, अत्यावश्यक संच, सुरक्षा संच खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येते. त्याचा लाभ मिळवू इच्छित जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी नोंदणी करण्यासाठी वाशिमच्या जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात तोबा गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले.दरम्यान, १७ डिसेंबरला एका इसमाने त्याच्या आईची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी कार्यालयात धडक दिली. यावेळी त्याने काही कर्मचाऱ्यांनी नाहक वाद घालून शिविगाळ केली व मारहाणही केली. यात कंत्राटी लिपीक पवन सुधाकर सतरके यांना दुखापत झाली. त्यांनी याप्रकरणी वाशिम पोलिसांत त्याचदिवशी तक्रार देखील दाखल केली, अशी माहिती जिल्हा सरकारी कामगार अधिकारी नालिंदे यांनी दिली.८ वर्षांत १८ हजार कामगारांची नोंदणीजिल्ह्यात २०१२ ते २०२० या ८ वर्षांत १८ हजार ४ कामगारांनी नोंदणी केली. त्यापैकी जानेवारी २०२० अखेर नुतनीकरण केलेल्या कामगारांची संख्या ३१७४ असून नोंदणी व अंशदान शुल्कापोटी १६ लाख ८९ हजार ५८५ रुपये मंडळाच्या खात्यात जमा करण्यात आले.
सहा योजनांतर्गत २.८१ कोटींचा वाटपवाशिमच्या सरकारी कामगार अधिकारी कार्यालयास सहा योजनांतर्गत लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी शासनाकडून आतापर्यंत ३ कोटी ३५ लाख ५१ हजार ९०० रुपयांचा निधी प्राप्त झाला. त्यापैकी २० फेब्रूवारी २०२० पर्यंत २ कोटी ८१ लाख ७८ हजार रुपयांचा वाटप झाला, असे सरकारी कामगार अधिकारी नालिंदे यांनी सांगितले.