वाशिम : जिल्ह्यात एकीकडे कोरोना पॉझिटिव्ह आणि कोरोनाबळींची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे बँकांसमोरील गर्दी हटता हटेना, अशी विदारक परिस्थिती आहे. कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेता आता तरी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून गर्दी होणार नाही, याची दक्षता घेणे काळाची गरज ठरत आहे.
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्ह्यात ‘ब्रेक दि चेन’ मोहिमेअंतर्गत नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. त्यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने ३० एप्रिल २०२१पर्यंत बंद, तर अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. दवाखाने व मेडिकल्स् यामधून वगळण्यात आले आहे. बँकांची वेळ सकाळी ९ ते दुपारी १ अशी असून, बँकांसमोर अजूनही गर्दी होत आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दैनंदिन सरासरी ३५०पेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न होत आहेत. कोरोनाबळींची संख्याही वाढत असल्याने जिल्हावासियांची चिंता वाढत आहे. दुसरीकडे बँकांसमोर मात्र गर्दी होत असून, कुठेही फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याचे गुरूवार, २२ एप्रिल रोजी वाशिम शहरातील विविध बँकांसमोर दिसून आले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर तर नागरिकांची अक्षरश: झुंबड उडाली होती. यामुळे कोरोनाची साखळी खंडित होणार तरी कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे व्हेंटिलेटर बेड, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा असल्याने आरोग्यविषयक सुविधा अपुऱ्या पडत असल्याचे विदारक चित्र आहे, तर दुसरीकडे बँकांसमोर नागरिक हे बिनधास्त गर्दी करीत असल्याने सूज्ञ नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. अनेकजण तोंडाला मास्क न लावता फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम पाळत नसल्याचे गुरूवारी दिसून आले. या प्रकारावर बँक प्रशासन, तालुका प्रशासन कसे नियंत्रण मिळविणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.