वाशिम : राज्य शासनाने जारी केलेल्या नियमावलीनुसार जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात झाल्याने ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध सोमवारी हटविण्यात आले. जिल्हा पूर्णत: अनलॉक होताच बाजारपेठेत एकच गर्दी उसळल्याने उद्योग जगताला पुन्हा लवकरच उभारी मिळेल, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी धोका पूर्णपणे संपलेला नसल्याने अनलॉकमध्येही नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.
२०२० मध्ये पहिल्या लाटेत एप्रिल ते ३ जूनपर्यंत लॉकडाऊन असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंदच होती. त्यानंतर अनलॉकचे टप्पे सुरू झाल्याने बाजारपेठही हळूहळू सावरत गेली. व्यवसायाला उभारी मिळण्याच्या काळातच कोरोनाची दुसरी लाट आल्याने पुन्हा बाजारपेठ प्रभावित झाली. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात १४ एप्रिलपासून कडक निर्बंधाची अंमलबजावणी करण्यात आली. या दरम्यान अत्यावश्यक सेवा, कृषी व अन्य काही सेवांचा अपवाद वगळता उर्वरित दुकाने बंदच होती. मध्यंतरी दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी व्यापारी मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. दरम्यान, जून महिन्यात कोरोनाचा आलेख आणखी खाली आल्याने निर्बंध शिथिल झाले तसेच राज्य शासनाने जाहीर केलेल्या पाचस्तरीय अनलॉकमध्ये वाशिम जिल्ह्याचा समावेश पहिल्या स्तरात झाल्याने १४ जूनपासून जिल्हा पूर्णत: अनलॉक झाला. पहिल्याच दिवशी वाशिमसह रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा, शिरपूर, अनसिंग, शेलूबाजार येथील बाजारपेठेत नागरिकांची एकच गर्दी झाल्याचे दिसून आले. विविध वस्तू, साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असल्याने उद्योग जगताला उभारी मिळेल, अशा प्रतिक्रिया व्यावसायिकांमधून उमटत आहेत.
.....
बॉक्स
परवानगी मिळाली; पण सिनेमागृह बंदच !
अनलॉकच्या टप्प्यात ५० टक्के क्षमतेने मॉल, सिनेमागृह सुरू करण्यास परवानगी मिळालेली आहे, परंतु खबरदारीचा प्रयत्न म्हणून जिल्ह्यातील सिनेमागृह अद्याप सुरू करण्यात आले नाही. योग्य वेळ पाहून सिनेमागृह सुरू करण्याचा मानस सिनेमागृहाच्या व्यवस्थापकांनी व्यक्त केला.
००००००
बॉक्स
अभ्यासिकेला परवानगी देण्याची मागणी
अनलॉकच्या टप्प्यात सर्वच दुकाने सुरू झाल्याने शिकवणी वर्ग, अभ्यासिकेला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी समोर आली आहे. राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक व अन्य कार्यक्रमांना काही अटीवर परवानगी मिळते मग खासगी शिकवणी व अभ्यासिकांना काही अटींवर परवानगी का नाही? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.
०००००
धोका अजून टळलेला नाही; खबरदारी घ्यावी
दुसरी लाट ओसरत असली तरी कोरोनाचा धोका अजून पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. घराबाहेर पडताना मास्कचा नियमित वापर करावा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, व्यापारी व दुकानदार यांनीदेखील कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही या दृष्टिकोनातून आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
००००