नंदकिशोर नारे
वाशिम : येत्या दाेन दिवसावर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनासाठी शहरातील राख्यांच्या दुकानाने बाजारपेठ सजली आहे. शहरात लागलेल्या राख्यांच्या दुकानांमध्ये आपल्या भाऊरायांकरिता राखी खरेदीसाठी बहिणींनी एकच गर्दी केल्याचे १९ ऑगस्ट राेजी दिसून आले. यावेळी राख्यांच्या भावात वाढ झाल्याने बहिणींचे बजेट मात्र काेलमडल्याचे दिसून आले.
बहीणभावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस म्हणजे रक्षाबंधन. हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात. याच दिवसाला ‘रक्षाबंधन’ म्हणतात.
वाशिम शहरातील बाजारपेठेत लहान-माेठ्या व्यावसायिकांनी वैविध्यपूर्ण राख्यांनी दुकाने थाटली आहे. बाजारात यंदा विविध प्रकारच्या राख्या बघायला मिळत असून, विविध प्रकारच्या आकर्षक आणि डिझाइनमध्ये राख्या बाजारात उपलब्ध झाल्याचे दिसून आले. यामध्ये पारंपरिक असलेल्या देव राखींची मागणी माेठ्या प्रमाणात असून, त्याच बराेबर कुंदन राखी, चांदी, डायमंड, गाेल्डम यांसह विविध राख्या बाजारपेठेत विक्रीस आल्या आहेत. या खरेदी करण्यासाठी बहिणींची दुकानांवर माेठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.
..
कार्टून राख्या ठरताहेत बालकांचे आकर्षण
कार्टून, बाहुबली राख्या मुलांचे आकर्षण ठरत असल्याचे बाजारपेठेत दिसून येत आहे. बाजारात लहान मुलांसाठी माेटू पतलू, ॲंग्री बर्ड, पाेकमॅन, भीम, डाेरेमन, बाहुबली आदी असंख्य कार्टून राख्या आकर्षण ठरत आहे.
......
स्पंजच्या राख्या हद्दपार
पूर्वी स्पंजपासून तयार करण्यात येत असलेल्या राख्या माेठ्या प्रमाणात बाजारात दिसून यायच्या. यावेळी या प्रकारच्या राख्या काेणत्याच दुकानावर दिसून आल्या नाहीत.