वाशिम : विविध मार्गाने जिल्हा परिषदेला २०२१-२२ या वर्षात प्राप्त निधी ३१ मार्चपूर्वी खर्च व्हावा, या हेतूने सुटीच्या दिवशीही जिल्हा परिषद कार्यालय सुरू ठेवण्यात आले. शनिवारी (दि.२५) सर्वच विभागात कर्मचारी, अधिकारी कार्यालयीन कामकाजात व्यस्त दिसून आले.
‘मार्च एन्डींग’मध्ये शासकीय-निमशासकीय कार्यालयांत वर्दळ पाहावयास मिळते. प्राप्त निधी अखर्चित राहू नये म्हणून ३१ मार्चपूर्वी खर्च कसा होईल, या अनुषंगाने प्रशासकीय कार्यवाही करण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. जिल्हा परिषदेला सन २०२१-२२ या वर्षात मिळालेला निधी मार्च २०२३ अखेरपर्यंत खर्च करणे अनिवार्य आहे. त्या दृष्टीने नियोजनही करण्यात आले असून, अंमलबजावणी सुरू असताना १४ मार्च ते २० मार्च या दरम्यान जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी संपावर होते. त्यामुळे या दरम्यानची कामे खोळंबली असून, आता कामकाजाला गती देण्यासाठी वरिष्ठांनी पुढाकार घेतला आहे. ‘मार्च एन्डींग’ला केवळ सहा दिवसाचा कालावधी शिल्लक असून, त्यातच शनिवार व रविवारची सुटी गृहित धरली तर कामकाज आणखी प्रभावित होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद कार्यालय शनिवार व रविवार अशा सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी घेतला आणि त्यानुसार शनिवारी (दि.२५) जिल्हा परिषदेत वर्दळ दिसून आली.