जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १८ वर्षांवरील व्यक्तींना कोविड -१९ लसीकरण सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात लसीकरणाचा वेग व व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. लसीकरण केंद्रावर नागरिक लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहे. त्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न झाल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष शण्मुगराजन एस. यांनी एका आदेशाद्वारे सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपरिषद व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधीक्षक यांना लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने नागरिकांना लसीकरणासाठी टोकन प्रणाली वाटपाची कार्यपद्धती व जबाबदारीचे एकत्रितपणे नियोजन करण्याबाबतचे निर्देश २८ एप्रिल रोजी दिले होेते. मात्र, लसीकरण केंद्रात गर्दी होत असल्याचे दिसून येते. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे सर्वांनी मास्कचा वापर करावा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे आणि हात वारंवार धुवावे या त्रिसूत्रीचे पालन करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागातर्फे दिल्या जातात. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. लसीकरण केंद्रात नागरिकांची गर्दी होत असल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे येथे दिसून येते .गर्दी हटविण्यासाठी किंवा रांगेत फिजिकल डिस्टन्सिंगनुसार उभे राहण्यासाठी कुणी कर्मचारी बाहेर आला नाही किंवा सूचना दिल्या जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
टोकन नंतरही लसीकरण केंद्रात नागरिकांची गर्दी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 5:07 AM