लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात ५ एप्रिलपासून ‘ब्रेक दी चेन’ मोहीमेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. याअंतर्गत एकाचठिकाणी पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत; मात्र बॅंकांसमोर तुफान गर्दी होत असून त्यावर कसा घालणार आवर, असा प्रश्न निर्माण झाला आहे.कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्ह्यात ‘ब्रेक दि चेन’ मोहीमेअंतर्गत नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. त्यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने ३० एप्रिल २०२१ पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आले. यादरम्यान रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१)(२)(३) अन्वये संचारबंदी लागू असेल. संचारबंदीचे उल्लंघन केल्यास प्रतिव्यक्ती १ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तसेच दर आठवड्याच्या सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत जमवाबंदी लागू राहणार असून या कालावधीत पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्रित फिरता येणार नाही किंवा एकत्रित जमता येणार नाही. प्रत्येक शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीला अत्यावश्यक कारणाशिवाय परवानगी शिवाय बाहेर फिरता येणार नाही, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यातील बॅंका पुर्वीप्रमाणेच सुरू असून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमत आहे. अनेकजण तोंडाला मास्क न लावता फिजीकल डिस्टन्सिंगचा नियम पाळत नसल्याचे दिसून येत आहे. या प्रकारावर प्रशासन कसे नियंत्रण मिळविणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बुधवारी वाशिम, रिसोड, कारंजा, मानोरा, मालेगाव, शिरपूर यासह इतरही ठिकाणी असलेल्या बॅंकांमध्ये व बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले.
बँकांसमोर गर्दी कायम; नियमांचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 11:57 AM