१४ जानेवारी रोजी मकरसंक्रांत असल्याने बाजारात गत आठ दिवसांपासून गर्दी दिसून येत आहे. आज गर्दीने मोठा उच्चांक गाठल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने वाहतूक विस्कळीत झााली होती. गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी शहर वाहतूक शाखेच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्यानंतरही काही अनुचित घटना घडल्या. बाजारपेठेत मकरसंक्रांतीच्या सणाला लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली तरी वस्तूंचे भाव कमी प्रमाणात होते. गतवर्षी मकरसंक्रांतीवर महागाईची संक्रांत आल्याने गृहिणींचा बजेट कोलमडला होता. मकरसंक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू कार्यक्रमानंतर वाण देण्याची पद्धत आहे. या वाणाच्या खरेदीसाठी शहरात जागोजागी दुकाने थाटली होती, तेथे महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. तसेच लहान मुलांची या दिवशी लूट करण्याची पद्धत आहे, त्याकरिताही चॉकलेटसह बोर व इतर पदार्थ खरेदीसाठी एकच गर्दी दिसून आली. काही फळे व वस्तू वगळता यावर्षी मकरसंक्रांतीस लागणारे साहित्य स्वस्त दिसून आले. बोरं, ऊस, वाटाण्याच्या शेंगा, पेरू, गाजर, भुईमूग शेंगा असलेली दुकाने एकाच जागी लागल्याने महिलांना खरेदी करताना सोयीचे झाले होते. भुईमूग शेंगा व काही पदार्थ १० रुपयांमध्ये ५० ग्रॅम होते; मात्र इतर फळे १० रुपये पावप्रमाणे विकण्यात आली.
.................
उखाण्याची पुस्तके
मकरसंक्रांतीनिमित्त महिलांच्या हळदी-कुंकू कार्यक्रमानंतर आपल्या पतीचे नाव उखाण्यात घेण्याची पद्धत आहे. काही महिलांना नावे उखाण्यात घेता येत नसल्याने अशा महिलांकरिता बाजारात उखाण्यांची पुस्तके विक्रीस आलेली दिसून आली. १५ रुपयांपासून २५ रुपयांपर्यंत उखाण्यासह तिळापासून बनविल्या जाणाऱ्या पदार्थांची पुस्तके विक्रीस आलेली दिसून आली.