लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : या आठवड्यात लॉकडाऊन जाहीर होण्याच्या भीतीने जीवनावश्यक वस्तूंची साठवणूक करण्यासाठी वाशिमकरांनी मंगळवारी बाजारपेठेत गर्दी केल्याचे दिसून आले. राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य सरकारने निर्बंध कठोर केले आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकानेवगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. त्यानुसार अन्य प्रकारची दुकाने बंद आहेत. दरम्यान, कोरोनाचा उद्रेक सुरूच असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी केव्हाही लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते, असा अंदाज बांधत शहरवासीयांनी जीवनावश्यक वस्तूंची साठवणूक करण्यासाठी बाजारपेठ गाठल्याचे सोमवार, मंगळवारी दिसून आले. गतवर्षी लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढविण्यात आल्या तसेच वस्तू घेण्यासाठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागले होते. हा पूर्वानुभव लक्षात घेता अनेकांनी संभाव्य लॉकडाऊन गृहीत धरून किराणा दुकानांमध्ये काही प्रमाणात गर्दी केल्याचे मंगळवारी दिसून आले तर काही नागरिकांनी लॉकडाऊनदरम्यानही अत्यावश्यक सेवेची दुकाने ठरावीक कालावधीसाठी सुरू राहणार असल्याचा अंदाज वर्तवित जीवनावश्यक वस्तूंची साठवणूक करण्याची गरज नसल्याचे सांगितले. मंगळवारी सायंकाळी उशिरा लाॅकडाऊनची घोषणा झाली असून, १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजतापासून अंमलबजावणी होणार आहे. दरम्यान, दुकानांमध्ये एकाचवेळी पाचपेक्षा अधिक व्यक्तींना प्रवेश दिला जात असल्याचे मंगळवारी दिसून आले.
जीवनावश्यक वस्तूंची साठवणूक करण्यासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 12:21 PM