लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : जीवनावश्यक वस्तू म्हणून भाजीपाला हर्राशी शिरपूर येथील गुजरी भागात दररोज सुरू आहे. मात्र, या ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असल्याने शनिवार, ४ एप्रिलपासून हर्राशी बंद करण्याचा निर्णय व्यापारी, आडतदारांनी घेतला. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संचारबंदी लागू केलेली आहे. जिल्ह्यातील आठवडी बाजारही रद्द केले असून, गर्दी होऊ नये म्हणून भाजीबाजार वेगवेगळ्या ठिकाणी भरविण्यात येत आहे. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्याच्या सूचनाही जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दिलेल्या आहेत. या सूचनांची अंमलबजावणी शिरपूर येथे होत नसल्याचे ३ एप्रिल रोजीदेखील भाजीपाला हर्रासी करताना दिसून आले. मालेगाव तालुक्यातील सर्वात मोठी व्यापारपेठ म्हणून शिरपूरची ओळख आहे. जिल्ह्यात भाजीपाला उत्पादनासाठी शिरपूर ओळखले जात असून, येथे दररोज भाजीपाला हर्रासी केली जाते. बुधवारला आठवडी बाजार असतो. जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांच्या निर्देशानुसार आठवडी बाजार पूर्णत: बंद आहे. गुजरी भागात ३० मार्चपर्यंत भाजीपालावर्गीय वस्तूची हर्राशी केली जात होती. मात्र तेथील होणारी गर्दी धोकादायक वाटत असल्याने गावाबाहेरील आसेगाव रोडस्थित आठवडी बाजारच्या जागेत ३१ मार्चपासून हर्राशी सुरू केली. तेथेही व्यापारी व नागरिकांकडून भाजीपाला खरेदीसाठी मोठी गर्दी होऊ लागली. हे लक्षात घेऊन आठवडी बाजारात दोन ठिकाणी ५० फुटाच्या अंतरावर भाजीपाला हर्राशी करण्याच्या सूचना स्थानिक दक्षता समितीने दिल्या. मात्र तरीसुद्धा ३ एप्रिल रोजी भाजीपाला हर्राशी वेळी मोठी गर्दी झाली. येथे सोशल डिस्टन्सिंगचा कोणताही नियम पाळण्यात आला नाही. नागरिकांच्या वाढत्या गर्दीचा धोका लक्षात घेऊन भाजीपाला आडतदार विकास चोपडे, संजय बाविस्कर यांनी भाजीपाला हर्राशी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून सदर निर्णयाची अंमलबजावणी शनिवार, ४ एप्रिलपासून करणार असल्याचे विकास चोपडे यांनी सांगितले.
भाजीबाजारात गर्दी कायम; हर्रासी बंद करण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 12:44 PM