- संतोष वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विद्युत विषयक कामे आणि स्वतंत्र वीज मीटर नसल्याच्या किरकोळ कारणावरून जिल्हा सामान्य रुग्णालयातील सव्वा दोन कोटी रुपये किंमतीची सीटी स्कॅन मशीन नऊ महिन्यानंतरही रुग्णसेवेत येऊ शकली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही मशिन कुलूपबंद असल्याने रुग्णांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.गोरगरीब रुग्णांची तपासणी मोफत व वेळप्रसंगी माफत दरात व्हावी या उद्देशाने शासनातर्फे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, आरोग्य उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाची निर्मिती केली जाते. वाशिम येथे जिल्हा सामान्य रुग्णालय असून, अद्याप जिल्हा स्त्री रुग्णालय कार्यान्वित झाले नाही. अगोदरच वाशिम जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसताना, प्राप्त वैद्यकीय उपकरणेही विहित मुदतीत कार्यान्वित होत नसल्याचा फटका गोरगरीब रुग्णांना बसत आहे.साधारणत: नऊ महिन्यांपूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयाला सवव दोन कोटी रुपये किंमत असलेली सीटी स्कॅन मशिन मिळालेली आहे. परंतू, विद्युत विषयक कामे पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने ही मशिन धूळ खात होती. साधारणत: चार महिन्यांपूर्वी जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळावा यासाठी आरोग्य विभागाने पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार होण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून ७.५० लाखांचा निधीही मिळाला. ्त्यामुळे मोठा अडथळा दूर झाला होता. एक, दोन महिन्यात विद्युत विषयक कामे पूर्ण होऊन सीटी स्कॅन मशिन सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतू, अद्यापही सीटी स्कॅन मशिन सुरू होऊ शकली नाही. परिणामी, गोरगरीब रुग्णांना खासगी ठिकाणावरून सीटी स्कॅन करण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी सर्वसामान्य रुग्णांमधून होत आहे.प्रशासनाची दिरंगाई गोरगरीब रुग्णांच्या मूळावरशासनाकडून सीटी स्कॅन मशिनसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणि त्यानंतर विद्युत विषयक कामे पूर्ण करण्यासाठी ७.५० लाखांचा निधी मिळालेला असतानाही, सीटी स्कॅन मशिन कार्यान्वित होऊ शकली नाही, ही बाब दुर्देवीच म्हणावे लागेल. शहरात काही ठिकाणी खासगी सीटी स्कॅन मशीन आहेत. येथे गोरगरीब रुग्णांना जाणे आर्थिकदृष्टया परवडणारे नाही. गोरगरीब रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी शासनस्तरावरून सीटी स्कॅन मशीन आलेली असतानाही, प्रशासकीय दिरंगाईमुळे कार्यान्वित झाली नाही. यामागे अर्थकारण दडल्याची चर्चाही आरोग्य वर्तुळात रंगत आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयात सीटी स्कॅन मशिनसंदर्भात विद्युत जोडणीची कामे पुर्ण झालेली आहेत. केवळ वीज मीटर बसविणे बाकी आहे. महावितरणकडून वीज मीटर उपलब्ध होताच, तातडीने बसवून देण्यात येईल.- कौस्तुम अग्रवालकंत्राटदारजिल्हा सामान्य रुग्णालयात सीटी स्कॅन मशिनसंदर्भात विद्युत जोडणीची कामे पुर्णत्वाकडे आलेली आहेत. ही कामे विहित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संंबंधित कंत्राटदाराला दिलेल्या आहेत. येत्या दोन, तीन दिवसात वीज मीटर बसविण्यात येईल.- व्ही.बी. बेथारियाअधीक्षक अभियंता,महावितरण वाशिम
जिल्हा सामान्य रुग्णालयात सीटी स्कॅन मशिनसंदर्भात विद्युत जोडणी विषयक कामे पूर्ण झालेली नाहीत. यासाठी स्वतंत्र वीज मीटर बसविण्यात येणार आहे. विद्युत विषयक कामे पूर्ण झाल्यानंतर सीटी स्कॅन मशिन कार्यान्वित होईल. यासंदर्भात संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा सुरू आहे.- डॉ. अंबादास सोनटक्केजिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम