लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : खरीप हंगाम तोंडावर आला असून, कृषी विभागाने पीकनिहाय पेरणीचा अंदाज बांधला आहे. यानुसार यावर्षी ४ लाख १३ हजार १५० हेक्टरवर पेरणी गृहित धरली आहे. दरम्यान, कृषी विभागाने मागणी नोंदविल्यानुसार, आता बियाणे प्राप्त होण्यास प्रारंभ झाला आहे.गतवर्षी जिल्ह्यावर मेहेरबान असलेला वरुण राजा यावर्षीही वेळेवर हजेरी लावणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. ऐनवेळी धावपळ नको म्हणून शेतकरी आतापासूनच पेरणीसाठी जमीन सज्ज ठेवत असल्याचे चित्र पहावयास मिळते. बी-बियाणे, खतांची टंचाई भासू नये म्हणून कृषी विभागाने नियोजन केले असून, पेरणीच्या अंदाजानुसार बियाणे व खतांची मागणी नोंदविली आहे. गतवर्षी खरीप हंगामात ४ लाख २ हजार ४६६ हेक्टरवर पेरणी झाली होती. यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त हेक्टरवर अर्थात २ लाख ८७ हजार २२७ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होती. त्या खालोखाल ६३ हजार ५०१ हेक्टरवर तूर, १२ हजार ६८० हेक्टरवर मूग, १५ हजार २१७ हेक्टरवर उडीद, १९२ हेक्टरवर तीळ, १८ हजार ६३० हेक्टरवर कपाशी आणि २४३ हेक्टरवर अन्य पिकांचा पेरा होता. साधारणत: १५ वर्षांपूर्वी ‘कॉटन बेल्ट’ म्हणून लौकिक असलेल्या वाशिम जिल्ह्यात सोयाबीनने प्रवेश केला. सोयाबीनच्या प्रवेशानंतर कपाशीच्या लागवडीत प्रचंड घट झाली. सव्वा लाखांवर असलेला कपाशीचा पेरा आता १८ ते २० हजार हेक्टरच्या आसपास स्थिरावत असल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. यावर्षीही कपाशीची लागवड १८ हजार हेक्टरवर होण्याचा अंदाज कृषी विभागाने बांधला आहे. यावर्षी सोयाबीनचा सर्वाधिक पेरा राहणार असून, २ लाख ८० हजार ४०० हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. खरिपाचा पेरा लक्षात घेता कृषी विभागाने ९२ हजार ९६३ क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविली होती. यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त बियाणे जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. यामध्ये महाबीज व खासगी बियाण्यांचा समावेश आहे.मूग व उडिदाचा पेरा वाढविण्याचा प्रयत्नयावर्षी वेळेवर मान्सूनचे आगमन होण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. हा अंदाज लक्षात घेता कृषी विभागाने मूग व उडीदाचा पेरा वाढविण्याचे नियोजन केले आहे. गतवर्षी साडेबारा हजाराच्या आसपास असलेला मूगाचा पेरा यावर्षी २५ हजार हेक्टरवर करण्याचे नियोजन आहे. गतवर्षी १५ हजाराच्या आसपास असलेला उडीदाचा पेरा यावर्षी २४ हजार हेक्टरपर्यंत जाईल, असा अंदाज कृषी विभागाने बांधला आहे. कपाशी बियाण्यांची एक लाख पाकिटांची मागणीयावर्षी १८ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड गृहित धरून त्या अनुषंगाने बिटी कापूस बियाण्याच्या एक लाख पाकिटांची मागणी कृषी विभागाने वरिष्ठांकडे नोंदविली आहे. १८ मे पर्यंत जिल्ह्याला २६ हजार ६६० पाकिटांचा पुरवठा झाला आहे. लागवडीच्या तुलनेत कपाशीसह कोणत्याही बियाण्यांची टंचाई भासणार नाही. मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध आहे, अशी माहिती प्रभारी कृषी विकास अधिकारी नरेंद्र बारापत्रे यांनी दिली.
कपाशीची लागवड ‘जैसे थे’ राहण्याचा अंदाज
By admin | Published: May 20, 2017 1:45 AM