वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने लागू केलेल्या संचारबंदीची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाने सुरू केली असून, प्रमुख ठिकाणी व चौकांत चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय कुणी घराबाहेर पडले तर प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला असून, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजतापासून संचारबंदी लागू केली. ही संचारबंदी १ मे राेजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू राहणार असून, जिल्ह्यात संचारबंदी नियमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. गत काही दिवसांपासून दिवसा जमावबंदी व रात्रीची संचारबंदी होती. आता पूर्णवेळ संचारबंदी लागू राहणार असून, अत्यावश्यक कारणाशिवाय कुणी रस्त्यावर आढळून आले तर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता उर्वरित सर्व दुकाने कडकडीत बंद ठेवली जाणार असून, चोरी-छुपे दुकानांत खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असल्याचे निदर्शनात आल्यास संबंधित दुकानदारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. संचारबंदी नियमाची अंमलबजावणी म्हणून प्रमुख ठिकाणी व चौकांत पोलीस बंदोबस्त तैनात केला करण्यात आला आहे. कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी देखील सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.
000
बॉक्स.....
हॉटेलमधून पार्सल आणण्यासाठी जाण्यास मनाई !
हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारमध्ये केवळ घरपोच पार्सल सेवा सुरू राहणार आहे. पार्सल आणण्यासाठी कुणालाही हॉटेल, रेस्टॉरंट किंवा बारमध्ये जाता येणार नाही. या परिसरात कुणी ‘पार्सल’ घेण्यासाठी येत असल्याचे दिसून आल्यास संबंधितांविरूद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला.
००००
कोट बॉक्स
जिल्ह्यात संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. यासंदर्भात संबंधित सर्व यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत. संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता उर्वरित सर्व दुकाने सुरू करण्यास मनाई आहे. व्यापारी, नागरिकांनी संचारबंदीच्या नियमाचे पालन करून कोरोनाविरूद्धची लढाई जिंकण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.
- शण्मुगराजन एस.
जिल्हाधिकारी, वाशिम
000
कोट बॉक्स
संचारबंदी नियमाची अंमलबजावणी म्हणून प्रमुख ठिकाणी व चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. विनाकारण कुणी रस्त्यावर फिरताना आढळून आल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.
- वसंत परदेशी
जिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम
००००