वाशिम : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने लागू केलेल्या संचारबंदीचा पाचवा दिवसही केवळ फार्सच ठरला. बाजारपेठेतील मोजकी दुकाने बंद होती, तर वाट्टेल ती कारणे सांगून नागरिक शहरात बिनधोकपणे फिरत आहेत. रस्त्यावर एवढी वर्दळ होती की, कुठे आहे संचारबंदी? असे म्हणण्याची वेळ आली.
राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला असून, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने १४ एप्रिलच्या रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी लागू केली. ही संचारबंदी १ मेच्या सकाळी सात वाजेपर्यंत लागू राहणार असून, जिल्ह्यात संचारबंदीच्या नियमांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र, पहिल्या दिवसापासूनच संचारबंदीला न जुमानता नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याचे दिसून आले. संचारबंदीच्या पाचव्या दिवशी अर्थात रविवारी वाशिमसह रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा येथील प्रमुख रस्त्यांवर वर्दळ दिसून आली. बाजारपेठेतील मोजकी दुकाने बंद होती; तर वाट्टेल ती कारणे सांगून नागरिक शहरात बिनधोकपणे फिरत होते. रस्त्यांवर एवढी वर्दळ होती की, कुठे आहे संचारबंदी असे म्हणण्याची वेळ आली. संचारबंदी जाहीर करताना नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये असे आवाहन करण्यात आले होेते; पण त्याउलट परिस्थिती रविवारी सकाळपासून वाशिमसह अन्य शहरांत पाहायला मिळाली. प्रमुख चौकांमधून जाताना कुणीही हटकत नसल्याने, चौकशी करीत नसल्याने नागरिकांचे चांगलेच फावत आहे. सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत शहरातील संचारबंदीची स्थिती पाहण्यासाठी फेरफटका मारताना जणू शहराला संचारबंदीतून सूट दिली आहे की काय, अशी शंका येते.
०००
बॉक्स
मागील दाराने व्यवहार सुरू...
संचारबंदीत अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता उर्वरित सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र, रिसोड, मानोरा, कारंजा, मंगरूळपीर, मालेगाव, वाशिम, आदी सर्वच प्रमुख शहरांमध्ये मागील दाराने व्यवहार सुरू असल्याचे दिसून येते. हा प्रकार स्थानिक प्रशासनाला माहिती नाही, असे नाही; परंतु, संबंध जोपासण्याच्या नादात याकडे संबंधितांचा कानाडोळा होत असल्याची चर्चा आहे.
००००
बॉक्स
प्रमुख चौकांतून कुणीही या...
वाशिम शहरातील पाटणी चौकाचा अपवाद वगळता उर्वरित कोणत्याही चौकातून कुणीही या आणि कुठेही बिनधास्त फिरा, अशी परिस्थिती गत चार दिवसांपासून पाहावयास मिळत आहे. विनामास्क, ट्रिपल सीट वाहनाने सैराट झाली असून, याला आवर कोण घालणार? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
००००००
बॉक्स
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशांकडेही दुर्लक्ष..
राज्य शासनाने संचारबंदी लागू केल्याने वाशिम शहरासह जिल्ह्यात या संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी होण्यासंदर्भात जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी १५ एप्रिल रोजी आढावा घेतला. संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित सर्व यंत्रणांना दिले. वाशिम शहरातील नागरिकांची वर्दळ पाहता, संचारबंदीच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशांकडेही संबंधित यंत्रणांचे होणारे दुर्लक्ष शहरात सध्या चर्चेचा विषय बनत आहे.
०००००००००००