अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर दुकाने सुरू असल्याने मानोरा नगरपंचायतचे मुख्याधिकारी नीलेश गायकवाड व चमूच्या वतीने शहरात पाहणी केली जात आहे. १९ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३५ वाजता नगरपंचायत इमारतमधील (तळ मजला) इरफान शा जमील शा, इमरान शा जमील शा यांचे आइसकँडी, कोल्ड्रिंकचे दुकान सुरू होते. कोविडच्या नियमाने व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने दुकान सुरू ठेवता येत नाही. दुकान बंद करा, अशी सूचना केली असता, दुकान बंद करीत नाही, असे म्हणून शिवीगाळ केली व अंगावर धावून आले. हा प्रकार मुख्याधिकारी गायकवाड यांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षकांच्या कानावर टाकला तसेच याबाबत फिर्याद दिली. यावरून मानोरा पोलिसांनी आरोपी इरफान व इमरान यांच्याविरुद्ध २० एप्रिल रोजी भादंवि कलम १८८, २६९, २७० अन्वये गुन्हा दाखल केला.
अधिक तपास पोलीस निरीक्षक शिशिर मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार जगन्नाथ घाटे करीत आहेत.