वाशिम : शाळा, काॅलेज, ट्यूशनसह विविध स्वरूपातील क्लासेस करण्यासाठी सकाळी घराबाहेर पडणारी मुलगी सायंकाळी घरी परतेपर्यंत सुरक्षित राहावी, अशी प्रत्येक पालकाची अपेक्षा असते. मात्र, शहरात काही ठिकाणी रोडरोमिओंचे कट्टेच असून, मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे पालकांची डोकेदुखी वाढली असून, निर्भया पथकाकडून कारवाईचे प्रमाण नगण्य असल्याचे दिसत आहे.
वाशिम हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असले तरी शहराचा विस्तार मर्यादित स्वरूपातच आहे. त्यातही मुख्य चाैकातील मुलींची शाळा, अकोला नाका, जिल्हा कचेरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही रोडरोमिओ मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याची मनीषा बाळगून उभे राहतात. शहरात छेडखानीचे फारसे प्रकार घडलेले नाहीत. मात्र, वयात येणाऱ्या मुली चुकीच्या पद्धतीने प्रेमाच्या आमिषाला बळी पडून घर सोडून प्रियकरासोबत पळून जाण्याचे बरेचसे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत. यामुळे पालकांची डोकेदुखी वाढली आहे. निर्भया पथकाने विशेष लक्ष पुरवून रोडरोमिओंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी यानिमित्ताने होत आहे.
.................
मुलींची शाळा
वाशिम शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चाैकस्थित मुलींची शाळा आहे. शाळा भरताना आणि सुटल्यानंतर याठिकाणी काही मुले समुहाने उभी राहात असल्याचे दिसून येते.
...............
अकोला नाका
शहरातील अकोला नाक्याच्या पुढे महाविद्यालय वसलेले आहे. त्याठिकाणी ये-जा करणाऱ्या मुलींचा पाठलाग करण्याच्या उद्देशाने रोडरोमिओ सक्रिय झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
............
लाखाळा परिसर
लाखाळा परिसरात शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय वसलेले आहे. त्यात अनेक मुली शिक्षण घेतात. त्यातील काहींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी रोडरोमिओंचे कट्टेच तयार झाले आहेत.
...................
रोडरोमिओंविरूद्ध कारवायांमध्ये राखले जातेय सातत्य
वाशिम शहरात निर्भया पथक सक्रिय असून, पथकातील महिला पोलीस कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत.
मुलींच्या शाळा, महाविद्यालये, ट्यूशन, क्लासेसच्या ठिकाणी प्रामुख्याने गस्त घातली जात असल्याचे दिसून येत आहे.
रोडरोमिओंविरूद्ध कारवाई करण्यातही गेल्या काही वर्षांत सातत्य राखले गेल्याने छेडखानीचे प्रकार संपुष्टात आले आहेत.
.............
कोणी छेड काढत असेल तर येथे संपर्क करा
मुलींच्या छेडखानीचे विशेष प्रकार वाशिम शहरात घडलेले नाहीत. मात्र, असा कुठलाही प्रकार स्वत:सोबत घडत असेल तर कुणालाही न घाबरता निर्भया पथकाशी १०९१ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. संबंधित रोडरोमिओविरूद्ध सक्त कारवाई करू, असे पथकप्रमुख पुष्पा राऊत यांनी सांगितले.
..................
‘निर्भया’ची रोडरोमिओंत दहशत
महिला, मुलींची कुणी छेड काढत असेल तर संबंधितावर कारवाई करण्यासाठी वाशिम शहरात निर्भया पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे. पथकातील महिला पोलीस कर्मचारी सातत्याने शहरात गस्त घालत असल्याने रोडरोमिओंत चांगलीच दहशत पसरलेली आहे.
.................
कोट :
वाशिम शहरात महिला व मुलींच्या छेडखानीवर पूर्णत: नियंत्रण आहे. मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेण्याचे प्रकार अलीकडच्या काळात वाढले असले तरी यासंदर्भात कुणाची तक्रार आल्यास तत्काळ प्रभावाने कारवाई केली जाते. मुलींनीही ‘अलर्ट’ राहून स्वत:सोबत काही चुकीचे होत असल्यास न घाबरता तक्रार करावी.
- धृवास बावनकर, पोलीस निरीक्षक, वाशिम