प्रणाली चिकटे ही यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील पुनवट येथील रहिवासी आहे. सामाजिक कार्य विषयातून पदवी प्राप्त केली आहे. जगभराला भेडसावत असलेल्या प्रदूषणाच्या गंभीर समस्येकडे जनतेचे लक्ष वेधून पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्याचा संकल्प तिने केला आहे. तापमानातील वाढ, ऋतूचक्रातील बदल, वाढत्या प्रदूषणातून निर्माण होणाऱ्या आरोग्य आणि शेतीविषयक समस्या लक्षात घेत तिने राज्यभरात २० ऑक्टोबर २०२० पासून सायकल भ्रमंतीने जनजागृती सुरू केली आहे. शुक्रवार २२ जानेवारीपर्यंतच तिने यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला आणि वाशिम या विदर्भातील जिल्ह्यात विविध ठिकाणी फिरून ४,०५५ किलोमीटर अंतर पूर्ण केले आहे. पुढे बुलडाणा आणि जळगावमार्गे ती उत्तर महाराष्ट्रातून प्रवास करणार आहे.
---------
स्थानिक परिस्थितीचा अभ्यास
सायकलने राज्यभर फिरून पर्यावरण आणि स्त्रीशक्तीचा जागर करणारी प्रणाली चिकटे ही ग्रामीण आदिवासी, शहरी भागात जाऊन, स्थानिक सामाजिक, स्वयंसेवी संस्था, शाळा आणि शासकीय यंत्रणेच्या भेटी घेते. या ठिकाणी पर्यावरणविषयक जनजागृती करतानाच विविध स्तरातील लोकांशी संवाद साधून त्यांच्याशी चर्चा करीत पर्यावरण विषयक स्थानिक समस्यांचा अभ्यासही करीत आहे. या प्रवासात तिला जनतेचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. आपल्या प्रवासादरम्यान ती ग्रामीण भागातील एखाद्या कुटुंबाकडेच मुक्काम करते आणि तेथेच जेवणही करते.