- सुनील काकडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : भारतीय गोवंशामध्ये दुध उत्पादनाकरिता ‘गीर’ हा गोवंश प्रसिद्ध आहे. त्याच गीर गायीचे दूध विकून एका शेतकऱ्याने अवघ्या १६ महिन्यात ४ लाखांचे उत्पन्न मिळविण्याची किमया साध्य करून दाखविली. संतोष मोतीराम कोरडे (रा.फाळेगाव, ता. वाशिम) असे नाव असलेल्या या शेतकºयाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन परिसरातील इतरही असंख्य शेतकरी आता गीर गायीच्या संगोपनाकडे वळले आहेत.गुजरात राज्याचा पश्चिम व दक्षिण भाग, महाराष्ट्र राज्याचा गुजरातच्या सीमेलगतचा प्रदेश, राजस्थानातील ‘टोंक’ आणि ‘कोट’ हे जिल्हे ‘गीर’ गोवंशांचे उगमस्थान मानले जातात. याच भागात प्रामुख्याने गीर गोवंशाची मोठ्या प्रमाणात संशोधनात्मक तथा उत्तमरित्या गीर गोवंशनिर्मिती केली जाते. त्याचा सखोल अभ्यास करून वाशिम येथील देशी गोपालक रवि मारशेटवार यांनी काही प्रयोगशिल शेतकऱ्यांना गीर गोपालनासाठी प्रोत्साहित केले. यामाध्यमातून वंदे गो मातरम या नावाने स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी गटाचे सदस्य संतोष कोरडे यांनी गत ५ वर्षांपासून गीर गायीच्या संगोपनाचा ध्यास घेतला. गत १६ महिन्यांत त्यांनी ६५ रुपये प्रतिलिटर दराने गीर गायीच्या ६२५५ लिटर दुधाची वाशिम शहरातील घरोघरी जाऊन विक्री केली. त्यासाठी ग्राहकांचे भलेमोठे नेटवर्क देखील त्यांनी उभे केले. ६५ रुपये प्रतिलिटरचा दर ठेऊनही ग्राहकांमधून गीर गायीच्या दुधाला वाढती मागणी असल्याची माहिती गोपालक संतोष कोरडे यांनी दिली.गीर गाय प्रतीदिवस १६ लिटर दुध देते. दुध देण्याची अशी क्षमता भारतीय देशी जातीच्या इतरही अनेक गायींमध्ये आहे. पशुसंवर्धन विभागातील तज्ज्ञांनी आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा अवलंब करून नि:शुल्क सेवा दिल्यास वर्षभरात गीर गायीपासून किमान ८ ते १२ गीर गायीच्या कालवडी जन्माला येऊ शकतात. यामुळे निसर्गाच्या दग्याफटक्यामुळे दरवर्षी अडचणीत येणाºया शेतकºयांची आर्थिक स्थिती मजबूत होऊन त्यांचे जीवनमान उंचावू शकते. शासनाने याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत वंदे गो मातरम शेतकरी गटाचे प्रणेते रवि मारशेटवार यांनी व्यक्त केले.