नंदकिशोर नारे /वाशिमयावर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. पाऊस येईल, या आशेवर शेतकर्यांनी तुरीचे पीक घेतले; मात्र पावसाअभावी तुरीच्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान संभवत आहे. ज्या शेतकर्यांकडे पाण्याची व्यवस्था नाही, अशा शेतकर्यांचे पूर्णपणे पीक सुकले आहे. तर काही ठिकाणी फुले गळून पडत आहेत. जिल्हय़ात सर्वाधिक सोयाबीनचे पीक घेतल्या जाते. त्या तुलनेत तुरीचे पीक कमी असले तरी तेही हातचे जाण्याची भीती शेतकर्यांत आहे.जिल्हय़ात आधीच तुरीचे पीक कमी आहे. ज्या शेतकर्यांजवळ ओलीताची जमीन आहे ते शेतकरी गहू, हरभरा या पिकाला पसंती देतात. काही शेतकरी तुरीचे पीक घेतात. कोरडवाहू शेतकर्यांचे तुरीचे पीक पूर्णपणे सुकण्याच्या मार्गावर असल्याने यावर्षी तुरीच्या उत्पनातसुद्धा घट होणार असल्याचे चित्र आहे. नुकत्याच झालेल्या पावसाळय़ात प्रमाणापेक्षा कमी पाऊस झाल्याने जमिनीत पिकांना पाहिजे तसा ओलावा नसल्याने पिके नष्ट तर होतच आहेत. एखादा अवकाळी पाऊस झाल्यास तुरीच्या पिकांना जीवनदान मिळाले असते; मात्र तसेही न झाल्याने तूर उत्पादक शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यात जिल्हय़ात कृषी पंपासाठी केवळ २ ते ३ तासच विद्युत पुरवठा होत असल्याने व तोही अत्यंत कमी दाबाचा होत असल्याने रब्बीच्या पिकांचेही नुकसान संभवत आहे. खरिपातील सोयाबीन हातातून गेल्यामुळे पाणी उपलब्ध असलेल्या शेतकर्यांना रब्बी पिकांची आशा होती; पण तीही महावितरणच्या नियोजनशून्य कारभारामुळे निराशा झाली आहे.
जमिनीत ओलावा नसल्याने तुरीचे नुकसान
By admin | Published: November 07, 2014 1:12 AM