वाशिम : मानोरा तालुक्यातील शेतकरी आणि नागरिक भर उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनुभव मागील एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपासून घेत आहेत. अवकाळी गारपिटीचा सगळ्यात जास्त फटका शेतकरी आणि नदीकाठी असलेल्या शेतींना बसलेला आहे.
तालुक्यामध्ये अरुणावती,पूस, धावंडा, अडाण इत्यादी मोठ्या नद्या असून या नद्यांना भर पावसाळ्यात येतात तसे ओसंडून पूर उन्हाळ्यातील पाचव्या महिन्यात येत आहेत. शेतकरी यांचे एका आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपासून प्रचंड पाऊस आणि गारपिटीने लिंबू, ज्वारी, बाजरी,कांदा, भाजीपाला ई. पिकांची मोठ्या प्रमाणात हानी तालुक्यात झालेली आहे. कारखेडा येथील महिला शेतकरी गिताबाई देविदास राठोड यांनी एक एकर शेत शिवारात लावलेला, काही काढलेला व उरलेला काढणीस येत असलेला कांदा पीक अवकाळी पावसाने हातचे गेले आहे.
राठोड यांच्या शेतशिवारातून खोराडी नदीचा.पूर गेल्याने पिकाचे आणि शेतशिवाराचे मोठे नुकसान झाले असून शेताच्या मधोमध भागातून पुराचे पाणी गेल्याने खरडून गेलेल्या मातीसोबत शेती सिंचीत करण्याचे पीव्हीसी दहा ते बारा पाईप सुद्धा गेल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मानोरा तहसिलदार यांना ४ मे रोजी निवेदन देऊन योग्य तो दिलासा देण्याची मागणी केली आहे.