- अशोक चोपडेभर जहॉगिर (रिसोड) : रिसोड तालुक्यातील भर जहॉगिर परिसरात पावसाअभावी पिके संकटात सापडल्याने शेतकरी वरुणराजाचा धावा करीत होते. अशात ३० आॅगष्ट रोजी परिसरात पावसाने हजेरी लावली तीसुद्धा नुकसान करण्यासाठीच या पावसामुळे मोरगव्हाण येथील तीन शेतकºयांची झेंडु फुलांची शेती जमीनदोस्त झाल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मोरगव्हाण येथील शेतकरी तथा खरेदी विक्री संचालक विठलराव कोकाटे, ज्ञानबा कुंडलीक कोकाटे आणि दत्ता तुकाराम पारधी यांनी पारंपरिक खरीप पिकांसह आर्थिक विकास साधण्यासाठी वेगळा प्रयोग करताना हंगामी फुलशेती म्हणून झेंडुची लागवड केली होती. यात ज्ञानबा कुंडलीक कोकाटे यांनी दोन एकरात, विठलराव कोकाटे यांनी एका एकरात, तर दत्ता पारधी यांनीही एक एकराहून अधिक क्षेत्रात झेंडुची लागवड केली होती. या पिकासाठी त्यांनी मोठा खर्च केला. निंदण, खुरपण करून हे पिक वाढविले. आता हे पीक कळ्यांवर असून, येत्या महिनाभरात फुले परिपक्व होऊन शेतकºयांना त्यापासून मोठे उत्पन्न मिळण्याचा विश्वास वाटू लागला होता. गत १५ दिवसांपासून पावसाचा पत्ताच नसल्याने शेतकरी पावसाची प्रतिक्षाही करू लागले होते. अशातच पावसाने ऐन पोळ्याच्या दिवशी हजेरी लावल्याने शेतकरी सुखावले खरे; परंतु तब्बल दीड तास बरसणारा हा पाऊस झेंडूची शेती जमीनदोस्त करून गेला. आता या झाडांना फु ले उमलण्याची आशाच राहिली नाही. त्यामुळे या तिन्ही शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल आणि कृषी विभागाने या नुकसानाची पाहणी करून आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी हे शेतकरी करीत आहेत.
मुसळधार पावसामुळे झेंडू फुलशेतीची नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 4:19 PM