लोकमत न्यूज नेटवर्ककारपा : येथुन जवळच असलेले भिलडोंगर येथील शेतकरी गोविंद सिताराम पवार यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांचे झालेल्या जोरदार पावसामुळे शेतीचे नुकसान झाले . भिलडोंगर ते कोलार या रोडचे काम चालु असुन अर्धवट पुलामुळे सदर पावसाचे पाणी शेतामध्ये घुसुन पेरणीयोग्य असलेल्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निवेदन तहसीलदार मानोरा यांना दिले आहे. तसेच या परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे सुध्दा नुकसान आहे.कोलार ते भिलडोगर रस्ता कामाचे डांबरीकरण काम चालु असून शेतकरी गोविंद पवार यांच्या गट नं.४०७ ला लागुन रोडच्या पुलाचे काम चालु आहे. पवार यांनी वारंवार पुलाचे काम लवकर म्हणजे पावसाळ्यापुर्वी करण्यात यावे असे संबंधीत ठेकेदार मालपाणी सुपरवायझर निरंजन चव्हाण यांना सांगुनही काम रखडल्यामुळे जोरदार झालेल्या पावसाने अर्धवट पुलामुळे सरळ पाणी शेतात घुसल्याने ऐन पेरणीच्या दिवसात शेतीचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यापुढे मोठे संकट आले आहे . तर झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी व दोषीवर कारवाई करावी अश्ी मागणी गोविंद पवार यांनी मानोरा तहसीलदार व मानोरा पोलिस स्टेशनला निवेदनाव्दारे केली आहे. वरील रोडचे काम मुख्यमंत्री सडक योजनेंतर्गत चालु आहे. त्याचप्रमाणे यांनी चालु असलेल्या पुलाच्या कामाकडे दुर्लक्ष केल्यानेच शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे कळते. तेव्हा संबंधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रोडच्या कामाची तसेच नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करुन शेतकऱ्याला न्याय देण्याची मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.