वाशिम : मणिपूर राज्यातील पिडीत महिलांना तातडीने न्याय द्यावा, दोषींवर कठोर शासन करावे आणि मणिपूर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेवून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी यांसह अन्य मागण्यांसाठी समनक जनता पार्टीच्यावतीने २६ जुलै रोजी वाशिम शहरात धिक्कार मोर्चा निघाला.शहरातील क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले स्मारक येथून मोर्चास सुरूवात झाली. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक, शहीद अमोल गोरे चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वसंतराव नाईक चौक मार्गे सिव्हिल लाईन येथून मार्गक्रमण करत अकोला नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. ‘लाज गेली, लाज गेली, भारत सरकारची लाज गेली, चौकीदाराने मौन पाळले, मणिपूर मुख्यमंत्री गप्प बसले’ अश्या विविध घोषणा देत मणिपूर येथील पिडीत महिलांना तातडीने न्याय द्यावा अशी मागणी लावून धरली.
या धिक्कार मोर्चाचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभा घेऊन करण्यात आला. यावेळी समनक जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. रामकृष्ण कालापाड, राष्ट्रीय नेते प्रा. डॉ. अनिल राठोड, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख पी. एस. खंडारे, जिल्हाध्यक्ष गजानन धामणे, महिला जिल्हाध्यक्ष शीतल राठोड, जिल्हा संघटक संजय वाणी, महाराष्ट्र अंनिसचे प्रधान सचिव प्रा. महेश देवळे, अ. भा. माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गजानन ठेंगडे, रवींद्र उर्फ राजूभाऊ काळे, केशवराज काळे आदींनी भाषण केले.