लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात विविध ठिकाणी धोकादायक ठरणारे वीज खांब आणि विजेच्या तारांची दुरुस्ती करण्यासाठी निविदा प्रक्रिया पार पाडण्यात आल्या आहेत; परंतु ही मोहिम संथगतीने सुरू आहे. विविध ठिकाणी अद्यापही जीर्ण किंवा झुकलेले खांब उभे आहेत. त्यामुळे संबंधित परिसरात अपघाताची भितीही कायमच आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी वीजखांबांची स्थिती वाईट असून, विजेच्या ताराही लोंबकळत असल्याने वादळी वाºयामुळे या तारांचे घर्षण होऊन वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागतोच शिवाय धोकादाय खांबामुळे अपघाताचीही भिती आहे. या संदर्भात महावितरणकडे तक्रारीही प्राप्त झाल्या. या तक्रारींची दखल घेण्यात आली आणि महावितरणच्या आपत्ती व्यवस्थापन उपक्रमांतर्गत सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणाºया देखभाल दुरुस्तीच्या कामांच्या निविदा गत महिन्यात पार पडल्या. या अंतर्गत जीर्ण झालेले किंवा झुकल्यामुळे धोकादायक ठरू पाहणारे वीजखांब, लोंबकळणाºया तारांच्या दुरुस्तीसह इतर कामांना सुरुवातही झाली आहे. जिल्ह्यातील सहा विभागांत प्रत्येकी दहा लाखांचा खर्च करून ही कामे करण्यात येत आहेत. तथापि, ही मोहिम खूप संथगतीने सुरू आहे. अद्यापही बहुतांश ठिकाणी झुकलेले खांब जैसेथे असून, तारांची स्थितीही बदलल्याचे दिसत नाही. महावितरण अधिकारी याबाबत गंभीर नसल्याने कामांना वेग येत नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
जीर्ण वीजखांब आणि तारांच्या दुरुस्तीचे काम बारकाईने आणि काळजीपूर्वक करावे लागते. ही कामे टप्प्याटप्प्याने प्रत्येक तालुक्यात एकाच वेळी सुरू करण्यात आली आहेत. उपलब्ध निधीतून शक्य ती सर्वच कामे येत्या महिनाभरात करण्यात येतील.-विनय बेथारियाअधिक्षक अभियंता महावितरण, वाशिम