लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: विमानातून प्रवास करावा आणि आकाशातून भूतलाचे दर्शन घ्यावे, हे स्वप्न; परंतु ते कधी पूर्ण होईल याची खात्री नव्हती, मात्र लोकमतच्या संस्कार मोती स्पर्धेमुळे हे स्वप्न विद्यार्थी दशेतच पूर्ण झाले. दोन तासांचा रोमांचक विमान प्रवास ‘लोकमत’च्या उपक्रमामुळेच अनुभवता आला आणि उपराष्ट्रपतींचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शनही लाभले, अशी प्रतिक्रिया हवाई सफर विजेता दर्शन कि सनराव घाटे ााने व्यक्त केली.
मूळचा मानोरा तालुक्यातील शेंदुरजना आढाव येथील रहिवासी असलेला दर्शन वाशिम येथील शांतीनिकेतन इंग्लिश स्कूलमध्ये सातव्या वर्गात शिक्षण घेत आहे. त्याने सहावीत असताना लोकमतकडून आयोजित संस्कारांचे मोती स्पर्धेत सहभाग घेतला आणि तो वाशिम जिल्ह्यातून विजेता ठरला. त्यामुळे या स्पर्धेतील विजेत्यांसाठी पुरस्कार स्वरूपात ठेवलेल्या नागपूर-दिल्ली या हवाई सफरीसाठी तो पात्र ठरला. हा प्रवास करून परत आल्यानंतर त्याने लोकमतशी संवाद साधताना आपल्या भावना व्यक्त केल्या. नागपूर विभागातील संस्कारांचे मोती स्पर्धेतील सर्व विजेते ठरलेल्या दिवशी सकाळी ७ वाजता नागपूरहून दिल्लीसाठी विमान प्रवासाला निघाले. सर्वांचाच हा पहिला विमान प्रवास होता. त्यामुळे सर्वच उत्साही असले तरी, मनात या प्रवासाबाबत कुतूहलही होते. दीड तासांच्या रोमांचक प्रवासानंतर आम्ही दिल्ली विमानतळावर दाखल झालो. या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या गोवा आणि महाराष्ट्रातील काही वेळाने भेट झाली. दोन्ही राज्यांतील विद्यार्थी एकत्र आले आणि देशाची राजधानी असलेल्या दिल्ली भेटीच्या प्रवासाला सुरुवात झाली. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंग, भाजपचे ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी आदिंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन संवाद साधण्याची संधी मिळाली. इंडिया गेट, राष्ट्रपती भवनही पाहण्याची संधी मिळाली. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी लोकमतच्या उपक्रमाची मुक्तकंठाने प्रशंसा करतानाच शालेय जीवनात हवाई सफर घडण्याची कोणतीही संधी उपलब्ध झाली नाही. तुम्हाला लोकमत समुहाने ती उपलब्ध करून दिली. त्यामुळे तुम्ही भाग्यवान आहात, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. हे सर्व काही जणू आपल्यासाठी एक स्वप्नच होते, असे दर्शन म्हणाला. विमानातील व्यवस्था उत्तम असली तरी, विमान उडाण घेताना भिती वाटत होती. नंतर मात्र ती पार पळाली. परतीच्या प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर विमान नागपूरला पोहोचले, असेही दर्शनने सांगितले. दरम्यान, लोकमत जिल्हा कार्यालयाच्यावतीने वाशिम तालुका प्रतिनिधी धनंजय कपाले यांनी दर्शनच्या निवासस्थानी जाऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
दर्शनच्या कुटुंबियांकडूनही लोकमतच्या उपक्रमाची प्रशंसा
लोकमत केवळ घटना घडामोडीच नव्हे, तर इतरही विविध उपक्रम राबवून विद्यार्थी, युवक, महिलांच्या सुप्तगुणांना वाव देण्याचा प्रयत्न करतो. लोकमतच्या उपक्रमांमुळे इच्छुकांना एक व्यासपीठ प्राप्त होेते. संस्कारांचे मोती या स्पर्धेमुळेच दर्शनला बालवयातच दिल्लीची हवाई सफर घडली असली तरी, त्याच्या ज्ञानातही भर पडली आहे, अशी प्रतिक्रिया दर्शनचे पिता किसनराव घाटे आणि कुटुंबियांनी व्यक्त केली.