अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. रवींद्र काळे यांनी, शेतकऱ्यांनी जमिनीचे आरोग्य राखण्यासाठी पिकांची फेरपालट करणे, सेंद्रिय खतांचा वापर करणे, माती तपासणी अहवालानुसार खतांचे नियोजन करणे इत्यादीविषयी माहिती दिली. तसेच ज्या शेतकरी बंधूंना सिंचनाकरिता पाण्याची कमतरता असेल, तर त्यांनी लवकर येणाऱ्या जाती, जसे प्रगती आणि पिडीकेव्ही वायगाव यांची निवड करावी, असे आवाहन केले.
तांत्रिक मार्गदर्शनात निवृत्ती पाटील यांनी विदर्भातील हळद पिकाची सद्यस्थिती मांडून उत्पादनात प्रचंड तफावत असल्याचे सांगितले. परिसरातील काही शेतकरी प्रती एकरी ४० क्विंटल उत्पादन घेणारे असताना काही शेतकऱ्यांचे उत्पादन मात्र १८ ते २० क्विंटलपर्यंत मर्यादित आहे. उत्पादनातील ही तफावत कमी करण्याकरिता शेतकरी बंधूनी आधुनिक लागवड तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. सादरीकरणात त्यांनी हळद पिकासाठी योग्य जमिनीची निवड, लागवडीची वेळ, बेणे निवड, लागवड पद्धती, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, तण नियंत्रण इत्यादीविषयी सखोल मार्गदर्शन केले. हळद हे पीक सेंद्रिय खतांना उत्तम प्रतिसाद देते, त्यामुळे शेतकरी बंधूंनी सेंद्रिय खतांचा वापर करूनच हळद लागवड करावी असे आवाहन केले.
बहुसंख्य शेतकऱ्यांनी ऑनलाईन तसेच यु ट्युब लाईव्हच्या माध्यमातून उपस्थित राहून प्रशिक्षणाचा लाभ घेत समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन संगणकतज्ज्ञ श्रीकृष्ण बावस्कर यांनी केले.