लोकमत न्युज नेटवर्क दगड उमरा (वाशिम) : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वन्यप्राण्यांच्या शिकारीत वाढ झाल्याचे दिसून येत होते. वनविभागाने काही प्रकरणात कारवाई केली असली तरी, यावर नियंत्रणासाठी प्रभावी उपाय योजना करण्यात येत नव्हत्या. वनविभागाची उदासीनता उघड करण्यासाठी लोकमतने रविवारी वाशिम तालुक्यातील दगड उमरा शिवारात स्टिंग आॅपरेशन राबविले. त्यात काही लोकांनी अगदी गावालगतच्या शिवारातच शिकारीसाठी जाळे बांधल्याचे आणि एक दोन सशांची शिकारही केल्याचे दिसून आले.कोरोना विषाणू संसर्गासाठी लॉकडाऊन जारी असताना उद्योगधंदे, बंद असल्याने काही मंडळी उदरनिर्वाहासाठी वन्यप्राण्यांची शिकार करीत असल्याची माहिती लोकमतला मिळाली होती. मंगरुळपीर येथील वाईल्डलाईफ कन्झर्वेशन या वन्यजिवांच्या संरक्षणासाठी धडपडणाºया संघटनेने या संदर्भात पारधीतांड्यात जाऊन पारधी बांधवांना मार्गदर्शन करीत त्यांना शिकारीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्नही केला. वनविभागाकडून काही प्रकरणात कारवाईसुद्धा करण्यात आली. त्यानंतरही जिल्ह्यातील वनपरिक्षेत्रात हरीण, काळविट, निलगाय, रानडुक्कर आदि वन्यप्राण्यांसह मोर, तितर, बटेर, लाव्हरी, या पक्ष्यांची शिकार होत असल्याचे आणि दगड उमरा शिवारात परगावातील काही मंडळी शिकारीचा व्यवसायच करीत असल्याची माहिती लोकमतला मिळाली. त्यावरून हा प्रकार प्रत्यक्ष उघडकीस आणण्यासाठी लोकमतने दगड उमरा शिवारात रविवारी स्टिंग आॅपरेशन राबविले. त्यात अगदी दिवसाला दुपारच्या वेळी काही मंडळींनी गावालगतच जाळे लावून सशांची शिकार केल्याचे दिसून आले. वन्यप्राणी पकडण्यासाठी जाळीसह कुत्र्यांचा वापर दगड उमरा शिवारात गत दोन चार दिवसांपासून वन्यप्राण्यांची शिकार होत असून, वन्यप्राणी, पक्षी पकडण्यासाठी शिकारी मंडळी फासे जाळीसह कुत्र्यांचाही आधार घेत असल्याचे दिसून आले. दिवसाढवळ्या गावालगतच्याच शेतशिवारात त्यांच्याकडून वन्यप्राण्यांची शिकार केली जात असतानाही वनविभाग याबाबत अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
दगड-उमरा परिसरात दिवसाढवळ्या वन्यप्राण्यांची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2020 4:18 PM