कोरोनामुळे सन २०२० मध्ये लाॅकडाऊन काळात सर्वच ठिकाणची दारू दुकाने बंद होती, तर चालूवर्षीही दोन महिन्यांपासून दारू दुकाने बंद असतानाही सर्रास दारूचा महापूर वाहत आहे. अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी दारू विक्रीतून मिळणाऱ्या महसुलाचा मोठा हातभार लागत असल्याचे बोलले जात आहे. प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये ४० लाख २४ हजार ३७२ लिटर देशी दारू, ८ लाख ५७ हजार ३४ लिटर विदेशी दारू, तर ९ लाख ७ हजार ५२४ लिटर बिअर विक्री करण्यात आली. सन २०२०-२१ मध्ये ४२ लाख ३९ हजार १६९ लिटर देशी दारू, ८ लाख ८१ हजार ४२० लिटर विदेशी दारू आणि ७ लाख ३० हजार ६६७ लिटर बिअर विक्री करण्यात आली. तसेच चालूवर्षी एकट्या एप्रिल महिन्यात देशी, विदेशी व बिअर मिळून ३ लाख १३ हजार ७५७ लिटर दारू तळीरामांनी रिचविली आहे.
............................
महसूलला दारूचा आधार
१) वाशिम जिल्ह्यात दरवर्षी कोट्यवधी रुपयांची दारू विक्री केली जाते. या माध्यमातून महसूलला दारूचा मोठा आधार मिळत आहे.
२) जिल्ह्यात २०१९-२० मध्ये ५७ लाख ८८ हजार ९३० लिटर, तर २०२०-२१ मध्ये ५८ लाख ५१ हजार २५६ लिटर दारू विक्री झाली आहे.
३) सन २०१९-२० च्या तुलनेत सन २०२०-२१ मध्ये ६२ हजार ३२६ लिटर दारूची अधिक विक्री झाली आहे.
................
बिअरची विक्री वाढली; विदेशीची वाढली
१) वाशिम जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये ९ लाख ७ हजार ५२४ लिटर बिअर विक्री करण्यात आली, तर सन २०२०-२१ मध्ये ७ लाख ३० हजार ६६७ लिटर बिअर विक्री करण्यात आली.
२) जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये ८ लाख ५७ हजार ३४ लिटर विदेशी दारू विक्री करण्यात आली. तसेच सन २०२०-२१ मध्ये ८ लाख ८१ हजार ४२० लिटर विदेशी दारू विक्री करण्यात आली.
३) सन २०१९-२० च्या तुलनेत २०२०-२१ मध्ये विदेशी दारूची विक्री घटली असून, १ लाख ५० हजार ७५३ लिटरने बियरची विक्री अधिक प्रमाणात झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
......................
वर्षभरात ३७ लाखांची दारू जप्त
१) राज्य उत्पादन शुल्क विभागाने वर्षभरात अवैध दारू व नियमाबाहेर जाऊन दारू विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाईचे हत्यार उगारले.
२) सन २०२०-२१ या वर्षात जिल्ह्यात अवैध दारूसंदर्भात ३२७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्या प्रकरणातील दारूचा मालही जप्त करण्यात आला आहे.
३) वर्षभरात जिल्ह्यात ३७ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची दारू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
४) दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत असून, नियमात राहूनच दारू विक्री करावी लागते. दारूची अवैध वाहतूक किंवा अवैध विक्री करणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जाते.
...................
१ कोटी १६ लाख लिटर दारू रिचविली
सन २०१९-२०----- ५७,८८,९३० लिटर
सन २०२०-२१----- ५८,५१,२५६ लिटर
..........................
कोट :
जिल्ह्यात अवैधरीत्या दारू विक्री होऊ नये. नियमांचे उल्लंघन करून कोणी दारू विक्री करत असेल तर तसा प्रकार हाणून पाडण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. याअंतर्गत गेल्या वर्षभरात ३२७ पेक्षा अधिक गुन्हे दाखल करून ३७ लाखांची दारू जप्त करण्यात आली आहे.
- अतुल कानडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, वाशिम