कारंजा लाड : शालेय पोषण आहारातील साखरेत कुजलेले बेडूक आढळल्याचा प्रकार कारंजा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या झोडगा येथील अंगणवाडीत उघडकीस आला. याप्रकरणी पोषण आहार पुरविणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील अंगणवाड्यांना पाकीटबंद आहार पुरविला जातो. त्यानुसार झोडगा येथील अंगणवाडीला सुद्धा पोषण आहाराचे वाटप ४ जुलैला अंगणवाडी सेविकेकडून करण्यात आले. यावेळी स्थानिक अंगणवाडीतील विद्यार्थी कबीर खेडकर याला देण्यात आलेल्या पोषण आहार ५ जुलैला त्याच्या पालकांनी उघडून पाहिला असता, साखरेत कुजलेले बेडूक आढळून आले. त्यामुळे घडलेला प्रकार अंगणवाडी सेविकेच्या कानावर टाकण्यात आला.
या प्रकाराची माहिती मिळताच प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी तुषार जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत झोडगा येथील अंगणवाडीला भेट देऊन पंचनामा केला आणि मृत बेडूक आढळलेले साखरेचे पाकिट ताब्यात घेतले. ग्रामीण भागातील अंगणवाडीला राज्यस्तरावरून शालेय पोषण आहार पुरवठा केला जातो. त्यामुळे याप्रकरणी पोषण आहार पुरवठादारावर काय कारवाई केली, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
पोषण आहाराचे पॉकिट प्रयोगशाळेतसाखरेत कुजलेले बेडूक आढळून आलेले पॉकिट तपासणीसाठी अमरावती येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात येईल, असे प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी तुषार जाधव यांनी सांगितले.