लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : उन्हाळ्याची चाहुल लागत असतानाच जिल्ह्यातील प्रकल्प तळ गाठत असून, ३ मध्यम आणि १३१ लघू प्रकल्पांत मिळून केवळ २३ टक्के जलसाठा उरला आहे. त्यामुळे शेकडो गावांत पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. तथापि, पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हाभरातील केवळ जिल्हाभरातील केवळ ३२ ग्रामपंचायतींनी पाणीटंचाई निवारणासाठी उपाय योजनांचे प्रस्ताव पाठविले आहेत. त्यात ३० विहिर अधीग्रहण, तर दोन टँकरचे प्रस्ताव आहेत.वाशिम जिल्ह्यात ३ मध्यम आणि १३१ लघू प्रकल्प मिळून एकूण १३४ प्रकल्प आहेत. त्यापैकी ३६ प्रकल्पांत केवळ मृतसाठा उरला असून, २३ प्रकल्पांत १० टक्क्यांहून कमी साठा आणि २६ प्रकल्पांत २५ टक्क्याहून कमी साठा उरला आहे. उर्वरित ४८ प्रकल्पांतील ३६ प्रकल्पांत ५० पेक्षा कमी आणि केवळ १२ प्रकल्पांत ५० टक्क्याहून अधिक उपयुक्त साठा उरला. त्यातच बाष्पीभवन झपाट्याने होत असल्याने प्रकल्प तळ गाठत आहेत. यातील बहुतांश प्रकल्पावर सिंचन होत असल्याने जिल्ह्यात यंदाही तीव्र पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात सध्याच अनेक गावांत पाणीटंचाई तीव्र झाल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंतीही सुरू झाली आहे.तथापि, अद्यापही कोणत्याच गावांत प्राप्त प्रस्तावातून पाणीटंचाई निवारणाच्या उपाय योजना सुरू करण्यात आलेल्या नाहीत. ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव सादर करण्यास विलंब होत असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.४.६० कोटींचा कृती आराखडाजिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यात संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने ४ कोटी ५९ लाख ९४ हजार रुपये खर्चाचा कृती आराखडा तयार केला आहे. या अंतर्गत जून २०१९ पर्यंत ५०४ गावांसाठी ४८१ उपाय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. पाणीटंचाई निर्माण झालेल्या भागांत या उपाय योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या कृती आराखड्यात ८ गावांत विंधन विहीर दुरुस्ती, ४ गावांत तात्पुरती नळ योजना, ३६ गावांत टँकरने पाणी पुरवठा, तर ४३३ गावांत विहिर अधीग्रहणाच्या उपाय योजनेचा समावेश आहे. मात्र, अद्याप या उपाययोजनांची अमलबजावणी झाल्याचे दिसत नाही.केवळ ३२ ग्रामपंचायतींचे प्रस्तावया समस्येवर उपाय योजना करण्यासाठी ग्रामपंचायतच्यावतीने पंचायत समितीमार्फत तातडीने प्रस्ताव पाठविणे अपेक्षीत असताना २६ जानेवारीपर्यंत केवळ ३२ ग्रामपंचायतींनी पंचायत समितीस्तरावर प्रस्ताव सादर केले आहेत. त्यात २० गावांत विहिरींचे अधीग्रहण करण्यासह दोन गावांत टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या मागणीचा प्रस्ताव आहे. त्यात वाशिम तालुक्यातील १५, रिसोड तालुक्यातील ११, मानोरा तालुक्यातील ३ आणि कारंजा तालुक्यातील केवळ एका ग्रामपंचायतीच्या प्रस्तावाचा समावेश आहे. यात मालेगाव तालुक्यातील राजुरा आणि रिसोड तालुक्यातील शेलुखडसे येथे टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी असून, त्यातील राजुरा येथील प्रस्ताव त्रुटीच्या कचाट्यात फसला आहे.
पाणीटंचाई निवारणासाठी विहिर अधीग्रहणाचे प्रस्ताव उपविभागीय अधिकारी स्तरावरच मंजूर होतात. यंदाच्या कृती आराखड्यानुसार आमच्याकडे टँकरचा एकही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही. टँकरचा प्रस्ताव आल्यानंतर त्याची पडताळणी करून मंजुरी देण्यात येईल.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिमरिसोड तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींकडून पाणीटंचाई निवारणाचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यातील ४ विहिरींच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून, शेलुखडसे येथील टँकरचा एकमेव प्रस्ताव वरिष्ठस्तरावर पाठविण्यात येणार आहे.- शरद कोकाटेसहाय्यक गटविकास अधिकारी, रिसोड