दादाराव गायकवाड
वाशिम : मूत्रपिंडाच्या आजारावर उपचार घेत असलेल्या मोठ्या भावाच्या निधनाचे वृत्त कळताच लहान भावाचा हृदयविकाराने मृत्यू झाला, तर या दोन भावांमधील प्रेम पाहून गावातील एका तिसऱ्याही व्यक्तीचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ही हृदय हेलावणारी घटना मानोरा तालुक्यातील सोयजना येथे २७ जून रोजी सकाळच्या सुमारास घडली.
मानोरा तालुक्यातील सोयजना येथील जनार्दन सीताराम पवार (७५) हे मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर वर्धा येथील सावंगी मेघेच्या रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवार २७ जून रोजी त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव घरी आणले. ते पाहूनच त्यांचे लहान बंधू मुरलीधर सीताराम (७०) यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना सोयजनावासीयांना सुन्न करणारी ठरली. या दोन भावांचे प्रेम पाहून गावातील धनुर्धर लक्ष्मण कोल्हे (५५) हेही भारावले आणि जनार्दन पवार यांचे अंत्यसंस्कार पार पाडून घरी परतल्यानंतर त्यांनाही हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याने त्यांचेही निधन झाले. एकाच दिवशी गावातील तिघांचा मृत्यू झाल्याने गावात स्मशान शांतता पसरली होती.
--------------------
अर्ध्या तासाच्या फरकानेच दोघांचा मृत्यू
जनार्दन पवार यांचे पार्थिव पाहून त्यांचे लहान बंधू मुरलीधर पवार यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला, तर जनार्दन पवार यांचे अंत्यसंस्कार पार पाडून घरी परतल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासानेच धनुर्धर कोल्हे यांनाही हृदयविकाराचा धक्का बसला. उपचारासाठी रुग्णालयात नेण्याची संधीही त्यांच्या नातेवाईकांना मिळू शकली नाही. मुरलीधर पवार यांच्या मृत्यूनंतर अवघ्या अर्ध्या तासातच धनुर्धर कोल्हे यांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव शोकमग्न झाले.