लोकमत न्यूज नेटवर्कतळप बु. (वाशिम) : गेल्या चार वर्षांपासून सातत्याने ओढवत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि याहीवर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने अंगाशिरावर वाढत चाललेले बँकेचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत येथील शेतकरी उल्हास चंदू जाधव (४५) यांनी १७ जुलै रोजी किटकनाशक औषध प्राशन केले. यवतमाळच्या रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा २० जूलै रोजी मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार, तळप बु. येथील शेतकरी उल्हास जाधव यांच्या नावे दोन एकर शेती असून त्यावरच स्वत:सह पत्नी आणि दोन मुलींचा ते उदरनिर्वाह करित असत. तीन ते चार वर्षांपासून मात्र सततच्या दुष्काळामुळे कुटूंबाचा गाडा ओढणे अशक्य झाले. यावर्षी त्यांनी भारतीय स्टेट बँकेच्या मानोरा शाखेकडून खरीप हंगामाकरिता ३७ हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्याआधारे दोन एकर शेतात पेरणी केली; मात्र पावसाने दडी मारल्याने डोळ्यादेखील पीक सुकत असल्याने पाहून ते चिंताग्रस्त झाले आणि याच विवंचनेत त्यांनी १७ जुल ै रोजी शेतात किटकनाशक औषध प्राशन केले. त्यांना तातडीने उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले; परंतु २० जुलै रोजी उपचारादम्यान त्यांचा मृत्यू झाला. शेतकरी उल्हास जाधव यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.
किटकनाशक प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 3:56 PM