लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर: शेलुबाजार-मंगरुळपीर मार्गावर चिखली फाट्यानजीक १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास अपघात घडून कंझरा येथील चेतन प्रभाकर वावगे (वय ३०) हा युवक गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी अकोला येथे नेण्यात येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार चेतन प्रभाकर वावगे हा रविवारी शेलूबाजार येथील दूध डेअरीवर दूध देऊन कंझरा येथे त्याच्या एम.एच. ३७ ई.९४५५ क्रमांकाच्या दुचाकीने परत जात होता. त्यावेळी चिखली फाट्यानजीक काँक्रीट मिक्सरचे वाहन व मशीन रस्त्याच्या कडेला उभी होती. या वाहनाचा अंदाज न आल्यामुळे चेतनचा त्यावर धडकून अपघात घडला. यात चेतन प्रभाकर वावगेच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली. त्यात अति रक्तस्राव झाल्याने त्याच्यावर तत्काळ शेलुबाजार येथील प्राथमिक आरोग्य वर्धिनी केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत महाकाळ यांनी प्राथमिक उपचार केले. दुखापत गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले; परंतु अकोला येथे पोहोचण्यापूर्वी वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. चेतन हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अचानक निघून जाण्याने परिसरामध्ये दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अपघातात जखमी युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 11:52 AM