वाशिम : डिसेंबर महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून आले असून, या महिन्यात वाशिम तालुक्यात १२३ कोरोना रुग्ण आढळून आले. कोरोनाचा आलेख खाली येत असला तरी संभाव्य धोका लक्षता घेता नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने शनिवारी केले.जून महिन्यात वाशिम तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला. सुरूवातीच्या काळात वाशिम शहरासह तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात होती. आॅगस्ट महिन्यापासून वाशिम शहरासह तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यास सुरूवात केली. सप्टेेंबर महिन्यात तालुक्यात कोरोनाचा उद्रेक झाला होता. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी या महिन्यात व्यापारी संघटनेने सात दिवशीय ‘जनता कर्फ्यू’ची हाकही दिली होती. आॅक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख खाली येत आहे. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यातही कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून आले. डिसेंबर महिन्यात वाशिम तालुक्यात एकूण १२३ कोरोना रुग्ण आढळून आले. कोरोनाचा धोका अजून संपलेला नसल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या दुसºया लाटेची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, बाजारपेठेत गर्दी करू नये, मास्कचा वापर करावा, हात वारंवार धुणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
वाशिम तालुक्यात डिसेंबर महिन्यात आढळले १२३ कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2021 3:54 PM