लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात उन्हाच्या झळा वाढत असतानाच विहिरीही कोरड्या पडू लागल्या आहेत. एकिकडे नळाने येणाºया पाण्यामुळे शहरात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत नसले तरी, विहिरीचा तळ खरवडून काढण्याची वेळ आल्याचे मार्चच्या अखेरपासूनच दिसत असून, जिल्ह्यातील ७९ सर्वेक्षण विहिरींच्या पातळीची पडताळणी केल्यानंतर भुजल पातळीत मागील पाच वर्षांच्या तुलनेत सरासरी १.१२ मीटरची घट आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मे महिन्यात तीव्र पाणीटंचाईची शक्यता आहे. जिल्ह्यात सरासरी ७९८.७० मिलीमिटर पाऊस पडतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून यात अनियमितता दिसून येते. त्यामुळे जिल्ह्याची पर्जन्यमानाची सरासरी कमी-अधिक होऊ लागली. मात्र सर्व धरणांमध्ये पाणीसाठा पुरेसा होत असल्याने फारशी पाणी टंचाई जाणवत नाही. वाशिम जिल्ह्याचे भूगर्भीय क्षेत्र मुख्यत: दख्खन बस्तर लाव्हा या प्रकारच्या खडकाचे आहे; पूर्णपणे बेसॉल्टने आच्छादित असलेल्या या जिल्ह्यात काही ठिकाणी विघटित, तर काही ठिकाणी व्हेसिक्युकर झिओलिटिक प्रस्तराची झीज झाली आहे. यामुळे पडलेल्या भेगांमुळे सच्छिद्रता निर्माण होऊन भूजल साठा होण्यास मदत होते; परंतु पावसाची प्रत्यक्ष सरासरी ही कागदावर मोठी दिसत असली तरी, गेल्या ५ वर्षांत जमिनीत मुरणारा पाऊस फारसा जिल्ह्यात पडलेला नाही. पडणार्या पावसाचा कालावधी कमी झाल्याने, तसेच पडलेल्या पावसाचे पाणी वेगाने वाहून जाते. याचा परिणाम भूजल पातळीवर होऊ लागला आहे. जिल्हा भूजल सर्वेक्षण विभागाच्यावतीने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील मिळून प्रायोगिक तत्वावर ७९ विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आले. यात २०१४ ते २०१९ ची सरासरी पाणी पातळी आणि जानेवारी २०१९ मध्ये केलेल्या भूजल सर्वेक्षण विभागाने सर्वेक्षणात भूजल पातळी सरासरी १.१२ मीटरने घटल्याचे आढळून आले आहे. त्यामध्ये कारंजा ०.७४, रिसोड १.५०, मंगरुळपीर ०.६६, वाशिम १.३२, मालेगाव १.१७ आणि मानोरा १.३३ असे भूजल पातळीचे तालुकानिहाय घटलेले प्रमाण आहे. भूजलपातळी वाढवण्यासाठी 'पाणी आडवा, पाणी जिरवा' अभियानाबरोबरच पाणी उपशावर निर्बंध घालण्याची आवश्यकता आहे. भूजल पातळी घटल्याचा सर्वाधिक फटका कूपनलिकांच्या खोदकामाला बसला आहे. यापूर्वी जिल्ह्याच्या कोणत्याही भागात सरासरी १५० ते २०० फुटांपर्यत कपनलिका खोदल्या जात होत्या; परंतु गेल्या तीोन वर्षांपासून कूपनलिकांचे खोदकाम ३०० फुटांच्यावर पोहोचले आहे. रिसोड तालुक्यातील स्थिती सर्वात गंभीर!रिसोड तालुक्यात शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानासह सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत गतवर्षीच्या आॅगस्टपासून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहेत. तथापि, या तालुक्यात गतवर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेत खूप कमी पाऊस पडला. त्यातच सिंचनासाठी झालेल्या वारेमाप उपशामुळे या तालुक्यातील भूजल पातळी ही जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाणात घटली असल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्ष मार्च महिन्याच्या अखेरीस करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार या तालुक्यातील भूजल पातळी मागील पाच वर्षांत सरासरी १.५० मीटरने घटली आहे. त्यामुळे या तालुक्यात आता पाणीटंचाईची स्थिती गंभीर झाली आहे.
वाशिम जिल्ह्याच्या भुजल पातळीत सव्वा मीटरची घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 3:35 PM