लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषदेच्या २२४ शाळांच्या ४०९ वर्गखोल्या शिकस्त असल्याने संभाव्य अपघाताची घटना टाळण्यासाठी सदर वर्गखोल्या पाडण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे सादर करण्याची तयारी मार्च महिन्यात केली होती. परंतू, त्यानंतर लॉकडाउन व संचारबंदी लागू झाल्याने हा प्रस्ताव प्रलंबित राहिला असून, शाळा सुरू होण्यापूर्वी शिकस्त वर्गखोल्यांची विल्हेवाट लावणे आवश्यक ठरत आहे.खासगी शाळांच्या तुलनेत सरकारी शाळांमध्ये फारशा भौतिक सुविधा उपलब्ध नसतात तसेच शिक्षणाचा दर्जाही उच्च प्रतीचा नसतो, अशी ओरड नेहमीच होत असते. गत चार, पाच वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळेतही विविध अभिनव उपक्रम राबवून शैक्षणिक दर्जा उंचाविण्याचा प्रयत्न होत असल्याचे आशावादी चित्र जिल्ह्यात पाहावयास मिळते. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक अशा एकूण ७७९ शाळा असून येथे शिक्षण दिले जाते. शाळांना डिजिटलची जोड देण्यात आली तसेच नवीन वर्गखोल्या बांधकामासाठी शासनाकडे पुरेशा प्रमाणात निधी मिळावा, याकरीता गतवर्षी प्रस्तावही सादर केला. शासनाकडून निधी मिळण्याची प्रतिक्षा आहे. दरम्यान गतवर्षी शिक्षण विभागाने केलेल्या पाहणीनुसार, जिल्हयातील २२४ शाळेच्या ४०९ वर्गखोल्या शिकस्त असल्याचे समोर आले होते. यामधील काही वर्गखोल्या धोकादायक अवस्थेत असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय वर्गखोली पाडता येत नसल्याने शिक्षण विभागाने या निर्लेखित वर्गखोल्यांची प्रशासकीय प्रक्रिया फेब्रुवारी महिन्यात हाती घेतली होती. ४ फेब्रुवारी रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत निर्लेखित (वर्गखोल्या पाडणे) ४०९ वर्गखोल्यांचा प्रस्ताव मंजूर झाला होता. त्यानंतर आवश्यक ती प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून,हा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे पाठविला जाणार होता. परंतू, त्यानंतर कोरोना विषाणू संसर्गामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून लॉकडाउन व संचारबंदी लागू झाली आणि वर्गखोल्यांचा प्रस्ताव बाजूला पडला. सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘स्ट्रक्चरल आॅडीट’ केल्यानंतर नेमक्या किती वर्गखोल्या पाडावयाच्या याची निश्चिती होणार आहे. तथापि, हा प्रस्ताव पुढे सरकू शकला नसल्याने शिकस्त वर्गखोल्या ‘जैसे थे’ आहेत.२६ जूनपासून शाळा सुरू होण्याचे संकेतजिल्हा कोरोनामुक्त असल्याने नियोजित वेळेनुसार शाळा सुरू करण्याचे नियोजन शिक्षण विभागातर्फे केले जात आहे. दरम्यान, शाळा सुरू करण्यापूर्वी वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, पालक, मुख्याध्यापकांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत वाशिम जिल्ह्यात सध्यातरी कोरोनाबाधित रुग्ण नाही. परजिल्हा, परराज्यातून कामगार येण्याचा ओघ सुरू असल्याने धोका अजून टळलेला नाही. एकंदर परिस्थिती विचारात घेऊन शाळेचा निर्णय होणार आहे.
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या २२४ शाळांच्या ४०९ वर्गखोल्या शिकस्त असल्याने या वर्गखोल्या पाडण्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव मंजूरही झाला. परंतू, त्यानंतर लॉकडाउन व संचारबंदी लागू झाल्याने हा विषय बाजूला पडला. आता यासंदर्भात पाठपुरावा केला जाईल.- अंबादास मानकरशिक्षणाधिकारी (प्राथमिक)