मालेगाव (वाशिम) : वारंवार चकरा मारूनही पीककर्ज मिळत नसल्याचे पाहून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी १४ जून रोजी मालेगाव तालुक्यात दगडाची पेरणी करून बँक प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला.राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आधार प्रमाणिकरण रखडल्याने जवळपास २५ हजार शेतकºयांना नव्याने पीककर्ज मिळण्यात अडथळे येत आहेत. याशिवाय पात्र असूनही शेतकºयांना पीककर्ज मिळण्यास विलंब होत आहे. दमदार पाऊस झाल्याने शेतकºयांनी पेरणीला सुरूवात केली तर दुसरीकडे पीककर्ज मिळण्यास विलंब होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. मालेगाव तालुक्यातील गजानन काळे नामक शेतकºयाचे ४० हजाराचे पीककर्ज माफ झाले. कर्जमाफीच्या यादीत नाव असूनही बँकेकडून कर्ज दिले जात नाही. याकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १४ जून रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्या नेतृत्वात शेतात दगडाची पेरणी केली.
पीककर्जास विलंब; ‘स्वाभिमानी’च्या पदाधिकाऱ्यांकडून दगडाची पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 5:42 PM