संतोष वानखडे
वाशिम : सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामांत कुचराई करणाऱ्या ग्रामसेवकांची सुनावणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) वसुमना पंत यांनी १० ऑक्टोबर रोजी घेतली. यावेळी दिरंगाई करणाऱ्या ग्रामसेवकांची वेतनवाढ थांबविण्याची कारवाई करण्यात आली.
जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कामांचा आढावा घेण्यासाठी सर्व तालुक्याचे गट विकास अधिकाऱ्यांची बैठक जिल्हा परिषदेच्या सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेखाली १ सप्टेंबर रोजी घेण्यात आली होती. यावेळी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची १५ लाखांच्या आतील कामे सुरू करण्यास अनेक ग्रामपंचायतींची उदासिनता समोर आली होती. ओडिएफ प्लस मध्ये जिल्ह्यात प्रगती दिसत असली तरी सार्वजनिक शौचालय आणि सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामात विलंब होत असल्याबद्दल सीईओ वसुमना पंत यांनी नाराजी व्यक्त केली होती. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामांत कुचराई करणाऱ्या ग्रामसेवकांची सुनावणी लावण्याचे निर्देशही त्यांनी दिले होते. त्यानुसार, १० ऑक्टोबर रोजी सीईओंच्या कक्षात ग्रामसेवकांची सुनावणी घेण्यात आली. वारंवार सूचना देऊनही कामकाजात सुधारणा न करणाऱ्या तसेच दिरंगाई करणाऱ्या ग्रामसेवकांची वेतनवाढ थांबविण्याची कारवाई करण्यात आली. जिल्हा परिषद प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर आल्याने कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले.