पूर्वीच्या काळात जेव्हा विशेषत: ग्रामीण भागात कुठलेही दवाखाने नव्हते, आरोग्यविषयक सोईसुविधांचा अभाव होता, तेव्हा घरगुती उपचारांनीच विविध स्वरूपांतील आजारांवर मात केली जात असे. स्वयंपाकात हळद, जीरे, लसणीचा नियमित समावेश, हळद टाकून दूध पिणे, तुळस, दालचिनी, काळे मिरे आणि मनुका एकत्रितरीत्या पाण्यात टाकून उकळून घेतल्यानंतर त्याचा काढा करून पिणे, तीळ, नारळाचे तेल किंवा शुद्ध तूप दोन्ही नाकपुड्यांमध्ये लावणे, पुदिन्याची पाने किंवा ओवा एकत्रित उकळून घेतल्यानंतर पाण्याची वाफ घेणे. यांसारख्या घरगुती तथा अत्यंत कमी खर्चातील उपचारांनी सर्दी, खोकला, कफ, घशामध्ये वेदना होण्याचा त्रास दूर होतो, यावर आजही अनेकांचा दृढ विश्वास आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सामान्य लक्षणे आढळणाऱ्या अनेकांकडून यांसारख्या घरगुती उपचारांचा सर्वाधिक वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे.
.......................
जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण रुग्ण
३७,९७१
कोरोनामुक्त रुग्ण
३३,८०७
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण
३,७५६
कोरोना मृत्यू
४०७
.................
कोट :
सर्दी व खोकल्याचा त्रास होत असल्यास पुदिन्याची पाने आणि ओवा एकत्रित करून पाण्यात उकळून घ्यावे. तीन ते चार वेळा या पाण्याची वाफ घेतल्यास दोन्ही त्रास अल्पावधीतच दूर होतात.
- अनुसया संभाजी गरकळ
...............
कोरोना संसर्गामध्ये छातीत कफ होणे, घशात तीव्र वेदना होण्याची लक्षणे दिसून येतात. या त्रासापासून सुटका होण्यासाठी लवंग बारीक करून पावडर मध किंवा साखरेत मिश्रण करून घ्यावे. लवकरच आराम पडतो.
- बालीबाई रामधन राठोड
...............
तुळशीची पाने, दालचिनी, सुंठ, काळे मिरे एकत्र करून त्याची पावडर उकळलेल्या पाण्यात घालून चहासारखी प्यायल्याने आरोग्यासाठी खूप फायदा होतो. ताप, सर्दीतून यामुळे लवकर बरे होता येते.
- पवित्राबाई रामचंद्र मनवर
........................
आरोग्य चांगले ठेवण्यासाठी कशाचा काय फायदा?
ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे, छातीत कफ दाटणे ही कोरोना विषाणू संसर्गाची सर्वसामान्य लक्षणे असल्याचे आरोग्य विभागाकडून अनेक वेळा स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, ताप आल्यास एक चमचा तुळशीच्या पानांचा रस, एक चमचा अद्रकचा रस, एक चमचा मध हे मिश्रण दिवसांतून चार वेळा प्राशन केल्यास तापातून लवकर दिलासा मिळू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सर्दी झाल्यास अद्रक, काळे मिरे आणि तुळशीची पाने टाकून चहासारखे प्यावे. एक चमचा मध व अर्धा चमचा दालचिनीचे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावे. लसणीच्या पाच ते सहा पाकळ्या ठेचून त्याचे सेवन करावे, ओव्याची पुरचुंडी करून त्याचा वारंवार वास घ्यावा. यामुळे श्वसन मार्ग मोकळा होऊन सर्दीतून लवकर दिलासा मिळविता येणे शक्य आहे.
खोकला आल्यास अद्रक पाण्यात उकळवून ते पाणी कोमट असतानाच प्राशन करावे. एक चमचा अद्रकचा रस, एक चमचा तुळशीच्या पानांचा रस आणि तीन चमचे मध हे मिश्रण दिवसातून तीन वेळा घेतल्याने खोकल्याच्या त्रासापासून लवकर सुटका करता येऊ शकते. मात्र, सर्दी, खोकला आणि ताप अधिक प्रमाणात असल्यास डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा, असे तज्ज्ञ सांगतात.
....................
कोट :
गुळवेल, गूळ, अद्रक, दालचिनी, लवंग, हळद आणि तुळशीची पाने एकत्र करून उकळून घेतल्यानंतर, त्याचा एक कप काढा दिवसातून दोन वेळा घेतल्यास सर्दी, खोकला, तापातून बरे वाटण्यासह रोगप्रतिकारशक्तीही वाढते. आरोग्य सुदृढ राहण्याकरिता अनुलोम-विलोम, कपालभाती, भस्त्रिका यांसारखे प्राणायाम दररोज करणे आवश्यक आहे. कोरोना संसर्गाच्या काळात या घरगुती उपचारांवर प्रत्येकाने भर द्यायला हवा.
- डाॅ.बालाजी डाखोरे