साहेबराव राठोड
शेलूबाजार : २१व्या शतकात भारत डिजिटल इंडियाच्या दिशेने वाटचाल करत असताना मंगरुळपीर तालुक्यातील चोरद, जनुना, पिंप्री खुर्द, पिंप्री अवगण या गावांत मोबाईलला पाहिजे त्या प्रमाणात नेटवर्क नसल्याने नागरिक, विद्यार्थी हैराण आहेत; त्याचबरोबर येथील आरोग्यवर्धिनी केद्रांतर्गंतची लसीकरणाची माहिती ऑनलाईन पद्धतीने भरण्यातही अडचणी येतात. त्यावर तोडगा म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांना घराच्या छतांवर किंवा जि. प. शाळा इमारतीवर चढून ऑनलाईन प्रक्रिया पार पाडवी लागत आहे.
एकीकडे लसीकरण करून घेण्यासाठी नागरिक पुढे येत नाहीत त्यांना समजावून सांगण्यातच कर्मचाऱ्यांची अर्धी शक्ती खर्च पडत आहे. त्यात मोबाईल नेटवर्कची समस्या यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांवर मोठा ताण येत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
कोणत्याही मोबाईल कंपनीचे नेटवर्क नाही. कोरोनाकाळात ऑनलाईन शिक्षणापासून ते आर्थिक व्यवहारापर्यंत सर्व काही मोबाईल इंटरनेटवर चालतो आहे; परंतु आदिवासीबहुल व डोंगराळ भागात वसलेल्या गावांना अद्यापही मोबाईल कंपन्यांकडून नेटवर्कची सुविधा उपलब्ध करून न दिल्याने, मोबाईल कंपन्यांप्रती गावकऱ्यांचा रोश वाढला आहे.
गावातील लोकांचा मोबाईलवर संपर्क होऊ शकत नाही. मागील अनेक महिन्यांपासून गावात मोबाईल टॉवरवरून ग्राहकांची गैरसोय टाळावी ही मागणी पुढे येत आहे. मात्र, त्याची दखल कोणत्याही कंपन्यांकडून घेतली जात नाही. परिणामी मोबाईलधारकांना गावाबाहेर जाऊन किंवा उंच ठिकाणावर मोबाईलसाठी नेटवर्क शोधावे लागते. मंगरुळपीर तालुक्यातील चोरद गावात १९ एप्रिलला लसीकरण मोहीम राबविण्यात आली. लसीकरणाबाबतची जी माहिती ऑनलाईन अपलोड करावी लागते, ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना इंटरनेट मिळत नसल्याने त्यांना जि. प. शाळेच्या इमारतीवर चढून प्रक्रिया पूर्ण करावी लागली. लसीकरण खाली व प्रक्रिया छतावर असा प्रसंग आरोग्य कर्मचाऱ्यांवर आला होता तरीसुद्धा ४० नागरिकांना लसीकरण करण्यात आले. लसीकरण मोहिमेत डॉ. गजानन बोरकर, आरोग्यसेवक दादाराव तायडे, संदीप नप्ते तसेच सुवर्णा चव्हाण, वर्षा पाटील, मुख्याध्यापक नारायण बारड, दत्तात्रय लकडे, रवीनंदन येवले, प्रवीण उघडे, शंकर गोटे तलाठी एन. पी. पांडे सहभागी झाले होते.