या वर्षी पेरणी वेळेवर होण्याचे संकेत हवामान विभागाने दिल्याने, पेरणीसाठी खत-बियाणे खरेदीची शेतकर्यांची लगभग चालू आहे. अशातच वाशिम जिल्ह्यासाठी महाबीजचे सोयाबीनचे बीयाणे उपलब्ध असतानाही या बियाण्याची विक्रीपूर्वीच साठेबाजी केली जात असल्याचा आरोप मनविसेने केला. शासनाने महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकर्यांना महाबीजचे सोयाबीन बियाणे आरक्षित करून ठेवले आहे. मात्र, अनेक शेतकर्यांनी नोंदणी न केल्याने, खुल्या बाजारातही महाबीजच्या सोयाबीन बियाण्याला मोठी मागणी आहे. त्यात महाबीजने उपलब्ध केलेल्या बियाण्यातही कृषी वितरक काळाबाजार करत असल्याची तक्रार मनविसेने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. अनेक कृषी वितरकांकडून वाशिम जिल्ह्यासाठी आलेले बियाणे जादा दराने विकले जात आहे. हे वितरक डमी शेतकरी दाखवून बनावट ७/१२, तसेच इतर कागदपत्रांचे बनावट रेकॉर्ड तयार करून नियमानुसारच बियाण्याची विक्री करत आहोत, असे भासवत असल्याचा गंभीर आरोपही निवेदनाद्वारे करण्यात आला. कृषी विभागाने जिल्ह्यातील खत, बियाणे वितरकांची नित्याने तपासणी करून साठेबाजी, काळाबाजार, लिकिंग, थांबविण्यात यावी, अशी मागणी करतानाच, हा सर्व काळाबाजार तत्काळ थांबला नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे लावण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
बियाण्यांची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 4:30 AM