कोरोना योद्ध्यांप्रमाणे ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनादेखील विमा मंजूर करून त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत मिळणे अपेक्षित आहे. किन्हीराजा येथील ग्रामपंचायतीमध्ये वरिष्ठ लिपीक या पदावर कार्यरत असताना एकाला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या चार-पाच दिवसांपासून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना २२ एप्रिल रोजी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. चोखपणे आपले कर्तव्य बजावणारा कोरोना योद्धा अचानकपणे निघून गेल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी व अल्पवयीन तीन मुली आहेत. शासनाने इतर कोरोना योद्ध्यांप्रमाणे विमा मंजूर करून त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सर्व ग्रामपंचायत कर्मचारी जिवाची पर्वा न करता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व गावाला सहकार्य करीत आहेत. अशातच आमचे एक सहकारी हे कोरोनामुळे मृत्युमुखी पडले. त्यांच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर विम्याची रक्कम देण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे तालुका सचिव प्रमोद सांगळे यांनी केली.
कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसाला मदत देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 4:41 AM