---------
पावसामुळे क्षतिग्रस्त पूल जैसे थे
वाशिम: काजळेश्वर ते पानगव्हान मार्गावरील पानगव्हाण गावानजीकच्या नाल्यावर असलेला पूल गतवर्षी मुसळधार पावसाने आलेल्या पुरामुळे वाहून गेला. यामुळे वाहतुकीवर परिणाम होत असताना, अद्यापही या पुलाचे काम करण्यात आले नाही.
------------
रस्त्यावरील पूल धोकादायक
वाशिम: रिसोड तालुक्यातील रिसोड ते गोभणी या दोन गावांदरम्यान असलेल्या रस्त्यात पैनगंगा नदीपात्रात पुलाची उभारणी काही वर्षांपूर्वी करण्यात आली. या पुलाची उंची कमी असून, पुलावरून पाणी वाहते. त्यामुळे एखादे वेळी येथे अपघात घडण्याची भीती आहे.
---------
मुख्य चौकात लोंबकळत्या तारा
वाशिम: शिरपूर जैन येथील बस स्थानक परिसरात मुख्य चौकात वर्दळीच्या ठिकाणी महावितरण कंपनीच्या गार्डिंग नसलेल्या वीजतारा लोंबकळत्या स्थितीत आहेत. या तारा तुटल्यास अपघात घडण्याची भीती आहे. त्यामुळे या वीजतारा सुरळीत करण्याची मागणी होेत आहे.
००००००००००००००००
काजळेश्वर परिसरात दमदार पावसाची प्रतीक्षा
वाशिम: कारंजा तालुक्यातील काजळेश्वर परिसरातील पेरणी ९० टक्के आटोपली असताना, परिसरात अद्यापही दमदार पाऊस पडलेला नाही. त्यामुळे पिके संकटात सापडली आहेत. पिके सुकत असल्याने चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
-------------
गावांतील पथदिवे दुरुस्तीची मागणी
वाशिम: यंदाचा पावसाळा सुरू होऊन महिना उलटला आहे. आता रात्रीच्या सुमारास विजेची आवश्यकता भासते. ही बाब लक्षात घेऊन खेडेगावांत बंद, नादुरुस्त असलेले पथदिवे विनाविलंब दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
===============
ई-क्लास जमिनीवर अतिक्रमण
वाशिम: मंगरुळपीर तालुक्यात आसेगाव येथील ई-क्लास जमिनीवर अतिक्रमण केले आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही दखल घेण्यात येत नसून, दिवसेंदिवस अतिक्रमण वाढतच आहे.
-----------------
पिकांत डवरणी, खुरपणीला वेग
वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव परिसरात दमदार पावसामुळे पिकांना आधार मिळाला असून, कपाशीच्या पिकाची वाढ होण्यासह तणावर नियंत्रण मिळविण्यासाठी डवरणीचे फेर आणि खतांची पेरणी शेतकरी करीत असल्याचे रविवारी दिसले.
^^^^^^^
माध्यमिक शाळांचे निर्जंतुकीकरण
वाशिम: शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार कोरोनामुक्त गावांत १५ जुलैपासून आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. आणखी काही शाळा सुरू होणार असून, शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार या शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.
----------
जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्या नादुरुस्त
वाशिम मालेगाव : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या जवळपास ६० वर्गखोल्या नादुरुस्त आहेत. दुरुस्तीसाठी शासनाकडून निधीही मिळाला. त्यामुळे या वर्गखोल्यांची दुरुस्ती करून संभाव्य गैरसोय टाळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी २७ जून रोजी केली.
--------------------
शेतकऱ्यांना पीककर्जाची प्रतीक्षा कायम
वाशिम : यंदाच्या खरीप हंगामातील पेरणी संपत आली, तरी किन्हीराजासह परिसरातील एक हजारावर शेतकऱ्यांना अद्याप पीककर्ज मिळाले नाही. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत असून, जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेण्याची मागणी होत आहे.
^^^^^^