२३ फेब्रुवारी रोजी हजारोच्या संख्येने जनसमुदायाने पोहरादेवी येथे गर्दी केली हाेती संसर्गजन्य असलेल्या कोरोना ह्या विषाणूचा प्रसार पोहरादेवी आणि पोहरादेवीला येणाऱ्या श्रद्धाळूंमार्फत देशात इतरत्र होऊ नये यासाठी प्रशासनाने कोरोना चाचणीचे शिबिरेही २६ फेब्रुवारीपासूनच पोहरादेवीला चालू केलेली आहेत.
आपदा निवारण कक्षाने पोहरादेवी येथील प्रत्येक कुटुंबातील नागरिकांची कोरोना विषयक चाचणी प्राधान्याने करून घेऊन सामाजिक अंतर राखण्याचे, अति आवश्यक असल्यासच घराबाहेर पडण्याचे तथा विना मुखाच्छादन नागरिकांनी न फिरण्याविषयी च्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून घेण्याची मागणीही महंत रमेश महाराजांनी प्रशासनाकडे केली आहे.
..............
स्वस्त धान्य दुकानातील धान्य निकृष्ट
भ्रष्टाचार प्रतिबंधक समितीची तहसीलदारांना निवेदन
मानाेरा : तालुक्यासह वाशिम जिल्ह्यामध्ये शासकीय रास्त धान्य दुकानामार्फत नागरिकांना वितरित करण्यात येत असलेली ज्वारी, मका, गहू, कडधान्य अतिशय निकृष्ट असून, पशु खाद्याच्या सुद्धा लायकीची नसल्याचा आरोप भ्रष्टाचार प्रतिबंधक समितीच्या वतीने तहसीलदारांमार्फत शासन-प्रशासन स्तरावर देण्यात आलेल्या निवेदनातून केला आहे.
वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना जनावरे समजून जिल्हा पुरवठा विभाग आणि महसूल विभागाने मानवी आरोग्याला अपायकारक असणारे हे कडधान्य वितरित केलेले असून, शासकीय प्रयोग शाळेमार्फत रास्त धान्य दुकानात वितरणासाठी आलेल्या या जीवनावश्यक धान्याची तपासणी करूनच या धान्याचे वितरण यापुढे करण्याची मागणीही समितीने केली आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या पुरवठा आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर योग्य कायदेशीर कारवाई करण्यात न आल्यास या अधिकाऱ्यांना या निकृष्ट गहू ज्वारी आणि त्याच्या पोळ्या भ्रष्टाचार प्रतिबंधक समितीकडून खाऊ घालण्यात येण्याचा इशारा निवेदनाद्वारे करण्यात आलेला आहे.