वाशिम : तालुक्यातील ब्रम्हा ते वारला दरम्यान पाणंद रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. संबंधित ठेकेदाराने शाखा अभियंता किंवा तांत्रिक अधिकाऱ्यांना लेआऊट न देता काम करण्यात आले असून, कामाची चौकशी करावी. तोपर्यंत देयकाची अदायगी करू नये, अशी मागणी ब्रम्हा येथील शेतकऱ्यांनी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. (१६)
...................
जऊळका येथे ज्येष्ठांचे लसीकरण
वाशिम : मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथे ज्येष्ठ नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्यात आले. याशिवाय ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनाही कोरोना लस दिली जात असल्याचे दिसून येत आहे.
.............
मेडशी येथील रस्त्यांची दुरुस्ती
वाशिम : मेडशी येथील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली होती. ही बाब लक्षात घेऊन स्थानिक ग्रामपंचायतीने दुरुस्तीची कामे हाती घेऊन अनेक रस्त्यांची डागडुजी केली. यामुळे गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
.............
किन्हीराजात शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत
वाशिम : मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथे १९ ते २१ मार्च या कालावधीत अवकाळी पाऊस, वारा व गारपिटीने पिकांचे नुकसान झाले. त्याचे पंचनामे करण्यात आले असून, शेतकऱ्यांना आता मदतीची प्रतीक्षा लागून आहे.
...............
मालेगावात रात्रीची गस्त वाढली
मालेगाव : रात्रीच्या सुमारास होणाऱ्या भुरट्या चोऱ्यांवर नियंत्रण मिळविण्याकरिता पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपासून रात्रीची गस्त वाढविण्यात आल्याचे दिसून येत आहे.
...............
शुक्रवारपेठमध्ये सात पॉझिटिव्ह
वाशिम : शहरातील शुक्रवारपेठ भागात १ एप्रिल रोजी सातजणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे पुन्हा खळबळ माजली असून, नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले.
.................
बाजारपेठेतील गर्दी ओसरली
वाशिम : जिल्हा प्रशासनाने दुकाने, आस्थापना सुरू ठेवण्याची वेळ १ एप्रिलपासून वाढवून दिली आहे. यामुळे बाजारपेठेतील गर्दी ओसरल्याचे दिसून आले. रात्री आठ वाजेपर्यंत बाजारात तुरळक प्रमाणात वर्दळ दिसून आली.
..............
तिब्बल सीट वाहतूक; पोलिसांची कारवाई
वाशिम : स्थानिक पाटणी चाैकात शहर वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तळ ठोकून गुरुवारी दुपारच्या सुमारास प्रामुख्याने तिब्बल सीट वाहतूक करणाऱ्या दुचाकी वाहनांवर कारवाई केली. संबंधितांकडून दंड वसूल करण्यात आला.
...............
केंद्रीय विद्यालयाचे नवे सत्र झाले सुरू
वाशिम : येथील केंद्रीय विद्यालयाचे नवे शैक्षणिक सत्र ऑनलाईन पद्धतीने १ एप्रिलपासून सुरू करण्यात आले. काही दिवसांच्या सुटीनंतर शिक्षकांनी पुन्हा शाळेत रुजू होऊन विद्यार्थ्यांना आजपासून शिक्षण देणे सुरू केले.
...............
रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी
वाशिम : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून, कच्च्या स्वरूपातील या रस्त्याला खड्डे पडले आहेत. रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
...............
एस.टी. नादुरुस्त; प्रवाशांची गैरसोय
वाशिम : वाशिम आगाराची एस.टी.बस रिसोडवरून येत असताना रस्त्यातच बंद पडली. हा प्रकार गुरुवारी दुपारच्या सुमारास घडला. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. पर्यायी बस आल्यानंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली.